भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडला पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून पराभूत केले. तब्बल १० वर्षानंतर न्यूझीलंडच्या भूमीत न्यूझीलंडला पराभूत करण्याची किमया भारताने केली. या सामन्यात कुलदीप यादवने चार तर मोहम्मद शमीने ३ बळी टिपून न्यूझीलंडचा डाव अवघ्या १५७ धावांत गुंडाळला. त्यानंतर सलामीवीर शिखर धवनने नाबाद ७५ धावा करून सामना भारताच्या खिशात घातला. आता उर्वरित ४ सामन्यात चांगली कामगिरी करून मालिका जिंकण्याच्या दृष्टीने शिखर धवनने मास्टरप्लॅन सांगितला आहे.

‘ ज्या मैदानावर खेळायचे आहे, त्या मैदानाचा अभ्यास आम्ही करतो. मैदानाचा इतिहास काय, त्यावरील सरासरी धावसंख्या किती ते आम्ही पाहतो. पण त्याबरोबरच त्या वेळी खेळपट्टी कशी आहे? याचादेखील अंदाज घेतो. कारण ज्यावेळी आम्हाला सर्व गोष्टींचा अंदाज येतो, त्यावेळीच आम्ही किती धावसंख्या करता येईल आणि त्या दिशेने कशी फलंदाजी करावी लागेल याकडे लक्ष देऊ शकतो’, असे तो म्हणाला.

काही वेळा खेळपट्टी चांगली असूनही तेवढी गोष्ट पुरेशी नसते. पहिल्या सामन्यातच पाहायचे झाले, तर खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती, पण आम्ही न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात सुरुवातीपासून यशस्वी ठरलो आणि आमच्या डावाची सुरुवात चांगली झाली, त्यामुळे सामान्यचा निकाल एकतर्फी लागला. त्यामुळे पुढील सामन्यानातही वरच्या फळीतील फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारायचा असा आमचा ‘प्लॅन’ असल्याचे त्याने सांगितले आहे.

दरम्यान, या मालिकेतील दुसरा (२६ जाने.) आणि तिसरा (२८ जाने.) सामना बे ओव्हल येथे होणार आहे.