राहुल द्रविडचा ‘मिडास टच’, पहिल्याच पत्रकार परिषदेत सांगितली टीम इंडियाच्या यशासाठीची ७ सूत्र!

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची भारत वि. न्यूझीलंड ही पहिलीच मालिका असणार आहे!

rahul dravid on team india success
राहुल द्रविडनं टीम इंडियाच्या यशासाठी सांगितली ७ सूत्र!

‘द वॉल’ म्हणून फक्त भारतीयच नाही तर जगभरातल्या क्रिकेटप्रेमींसाठी परिचित आणि आवडता क्रिकेटपटू असलेला राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. २००७च्या वर्ल्डकपमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्याच टप्प्यात बाहेर पडला होता. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनी राहुल द्रविड पुन्हा एकदा टीम इंडियासाठी निर्णायक पदावर अॅक्टिव्ह झाला आहे. राहुल द्रविडच्या टीम इंडियातील ‘पुनरागमना’मुळे सर्वच भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आणि आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेमधून राहुल द्रविडनं या उत्साहासाठी आपण किती पात्र आहोत, याचाच दाखला दिला.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये एकीकडे रोहित शर्मा पहिल्यांदाच भारतीय संघाचा पूर्णवेळ टी-२० कर्णधार म्हणून नेतृत्व करणार असून राहुल द्रविड प्रशिक्षक म्हणून टीम इंडियासोबत असेल. या मालिकेच्या पूर्वसंध्येला या दोघांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं टीम इंडियाच्या यशासाठीची ७ सूत्र मांडली. अर्थात, यापुढे आपली वाटचाल कशी असतील, याचाच मास्टर प्लान राहुलनं समोर ठेवला!

१. रोहीत शर्मा

राहुल द्रविडनं रोहित शर्माचं टीम इंडियाच्या यशामधलं योगदान यावेळी अधोरेखित केलं. “आम्हा सर्वांना कल्पना होती की भविष्यात रोहीत शर्मा स्पेशल असेल. एक खेळाडू आणि एक लीडर म्हणून त्याचा प्रवास पाहाणं आनंद देणारं होतं. मुंबई इंडियन्ससोबत त्याचं यश अफलातून होतं. मुंबई आणि भारतीय क्रिकेटचा वारसा पुढे नेणं सोपं काम नाही. पण त्याने ते सहज आणि भन्नाट पद्धतीने केलंय”, असं द्रविड म्हणाला.

२. कोणता प्रकार महत्त्वाचा?

क्रिकेटच्या टी-२०, वनडे आणि कसोटी यापैकी कोणत्याही एका फॉरमॅटला प्राधान्य देणार नसल्याचं द्रविड म्हणाला. “क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट आमच्यासाठी सारखेच महत्त्वाचे आहेत. आमच्यासमोर आयसीसीच्या तीन स्पर्धा आहेत आणि आम्हाला त्यासाठी तयारी करायची आहे. माझ्या दृष्टीने म्हणाल, तर आम्हाला सातत्याने सुधारणा करत जायचं आहे. खेळाडू म्हणून आम्ही अधिकाधिक चांगले होत जाऊ”, असं राहुलनं यावेळी सांगितलं.

३. सुरुवातीला फक्त निरीक्षण!

आपण सुरुवातीला फक्त निरीक्षण आणि काही वरीष्ठ खेळाडूंशी चर्चेची भूमिका ठेवणार असल्याचं राहुल द्रविडनं सांगितलं. “वर्ल्डकप संपल्यानंतर विराट आणि रोहीतसोबत माझी थोडी चर्चा झाली. आम्ही क्वारंटाईनमध्ये आहोत. पण तरीही झूम किंवा गुगल मीटवरून आम्ही बोलतो. सुरुवातीला मी फक्त मागे राहून गोष्टी कशा घडतायत याचं निरीक्षण करतोय. प्रत्येक संघाचं वातावरण वेगवेगळं असतं. सुरुवातीला फक्त मागे राहून निरीक्षण करणं आणि गरज पडेल तेव्हा प्रत्यक्ष हस्तक्षेप करणं ही भूमिका मी स्वीकारली आहे. आमच्याकडे पुरेसा वेळ आहे, अजिबात घाई नाही”, असं द्रविड म्हणाला.

४. न्यूझीलंड अंडरडॉग? अजिबात नाही!

न्यूझीलंड आता अजिबात अंडरडॉग राहिलेले नाहीत, असं द्रविडनं यावेळी स्पष्ट केलं. “न्यूझीलंड एक उत्तम संघ आहे. गेल्या काही वर्षांत त्यांचा खेळ अप्रतिमरीत्या सुधारला आहे. त्यांना अंडरडॉग म्हणणं ही आता फॅशनच झालीये. बाहेरच्या लोकांना ते अंडरडॉग वाटत असतील. पण जे संघ त्यांच्याविरुद्ध खेळतात, त्यांना पूर्णपणे माहिती आहे की ते प्रबळ स्पर्धक आहेत”, असं द्रविडनं यावेळी स्पष्ट केलं.

५. तिन्ही प्रकारांसाठी वेगळ्या टीम?

टी-२०, वनडे आणि टेस्ट अशा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी वेगवेगळ्या टीम करण्याची पद्धत काही देश अवलंबत आहेत. मात्र, भारतासाठी असं काहीही न करण्यावर द्रविड ठाम आहे. “मला अजिबात वाटत नाही की भारतानं असं काही करण्याची वेळ आली आहे. रोहीतसारख्या खेळाडूनं सर्व फॉरमॅटमध्ये खेळावं अशी माझी इच्छा आहे. अर्थात, काही खेळाडू विशिष्ट प्रकारच्याच फॉरमॅटमध्ये खेळतील. हे साहजिक आहे. पण अशा वातावरणात आपण खेळाडूंसोबत चर्चा करत राहायला हवं आणि त्यांना आदर द्यायला हवा”, असं द्रविडनं स्पष्ट केलं.

IND vs NZ: “संघ फक्त एका खेळाडूवर लक्ष केंद्रित करत नाही”; सामन्याआधी राहुल द्रविड आणि रोहित शर्माची पत्रकार परिषद

६. मानसिक आरोग्य, ताण व्यवस्थापन आवश्यक

“फुटबॉलमध्ये देखील प्रमुख खेळाडू सर्व सामने खेळत नाहीत. खेळाडूंचं मानसिक आरोग्य, शारिरीक स्वास्थ्य महत्त्वाचं असेल. असं करताना संतुलनावर भर द्यावा लागेल. सर्व प्रकारांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी हा काळ आव्हानात्मक आहे. प्रत्येक खेळाडू सर्व प्रकारांमध्ये खेळू शकत नाही हे आपण स्वीकारलं पाहिजे”, असं द्रविड म्हणाला.

७. ‘प्रशिक्षक द्रविड’चा फॉर्म्युला!

वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी कोचिंग करण्यात काय फरक आहे, असं विचारल्यानंतर द्रविडनं त्यावर त्याचा दृष्टीकोन मांडला. “प्रशिक्षणाची काही तत्त्व तिन्ही प्रकारांमध्ये समान राहतात, पण काही तत्त्व मात्र नक्कीच बदलतात. तसेच, वेगवेगळ्या संघांसाठी ही तत्त्व वेगवेगळी ठेवावी लागतात. हे समजून घेण्यासाठी मला वेळ द्यावा लागेल. खेळाडूंना त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रवृत्त करायला नक्कीच वेळ द्यावा लागेल”, असं द्रविड म्हणाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs nz t20 series head coach rahul dravid success formula praised rohit sharma pmw

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला