टी २० विश्वचषकाच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा आठ विकेट्सने पराभव केला. टी-२० विश्वचषकातील भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. भारताचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग आता खूपच कठीण झाला आहे. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट चाहते प्रचंड संतापले आहेत. त्यांनी या पराभवाचे खापर इंडियन प्रीमियर लीगवर फोडले आहे. भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी आयपीएलवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

भारतीय संघाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर #BANIPL मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. भारतीय संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. आयपीएल १४ चा दुसरा टप्पाही यूएईमध्ये खेळवला गेला होता. त्यानंतर लगेचच टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात झाली. भारतीय संघाचे खेळाडू आयपीएलला जास्त महत्त्व देत असल्याचे क्रिकेट चाहत्यांचे मत आहे. त्यामुळे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नाहीत आणि थकलेले दिसत आहेत, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

भारतीय संघाच्या पराभवानंतर आयपीएलवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

आयपीएलवर भारतात बंदी घालावी

जेव्हा आपण वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धा खेळतो तेव्हा तरी आयपीएलवर बंदी घाला

हे सर्व “पैशासाठी” आहे, “देश”साठी नाही

बीसीसीआय आणि आयपीएल तुम्ही देव नाही आहात

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी झालेल्या ‘अव्वल-१२’ फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर आठ गडी आणि ३३ चेंडू राखून आरामात विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली आणि संघाला निर्धारित २० षटकात सात गडी गमावून ११० धावाच करता आल्या. भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक नाबाद २६ धावा केल्या. आघाडीच्या फळीतील फलंदाज फ्लॉप ठरले.

तर न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने ४९ धावा केल्या. किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसन ३३ धावांवर नाबाद राहिला. या विजयासह न्यूझीलंडचे दोन गुण झाले आहेत.