India vs New Zealand, T20 World Cup Final: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दोन्ही संघातील फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. पण जर जसप्रीत बुमराहने त्या निर्णायक षटकात जास्त धावा खर्च केल्या असत्या तर हा सामना भारतीय संघाच्या हातून जवळ जवळ निसटला होता. आता फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यातही बुमराहकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान या निर्णायक सामन्याआधी न्यूझीलंडचा स्टार फलंदाज ग्लेन फिलिप्सने मोठं वक्तव्य केलं आहे.

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणारा फायनलचा सामना ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी ६ मार्चला न्यूझीलंडचे खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात उतरले होते. दरम्यान सराव सुरू होण्यापूर्वी ग्लेन फिलिप्स पत्रकार परिषदेसाठी आला होता. ग्लेन फिलिप्सला जसप्रीत बुमराहबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना ग्लेन फिलिप्स म्हणाला, “जसप्रीत बुमराह हा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीत विविधता आहे. विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजी करणं खूप कठीण आहे.”

तसेच तो पुढे म्हणाला, “तो पण एक माणूसच आहे आणि आपल्या सर्वांसारखाच त्याचाही एखादा दिवस खराब असू शकतो. त्यामुळे त्याचा तो खराब दिवस आमच्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यातच असावा. बुमराह जेव्हा जेव्हा आपल्या टप्प्यापासून किंचितही भटकेल, तेव्हा त्या संधीचा फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

जसप्रीत बुमराह हा टी -२० क्रिकेटमधील अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. टी -२० वर्ल्डकप २०२६ मध्ये त्याला आतापर्यंत ७ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याने १५.९० च्या सरासरीने १० गडी बाद केले आहेत. बुमराहने ६.६२ च्या इकोनॉमिने धावा खर्च केल्या आहेत. तर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना त्याने १४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १६ गडी बाद केले आहेत. अंतिम सामन्यातही जसप्रीत बुमराहकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.