U19 World Cup IND vs NZ Live Updates in Marathi: अंडर-१९ विश्वचषकात भारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला असून सलग तिसरा विजय नोंदवला आहे. यासह आता ब गटात असलेल्या भारतीय संघाने आपले तिन्ही सामने जिंकून गुणतालिकेत पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. भारताच्या गोलंदाजांनी या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत न्यूझीलंडला १३५ धावांवर रोखलं. तर प्रत्युत्तरात आयुष म्हात्रे व वैभव सूर्यवंशीच्या जोडीने भारताला सहज विजय मिळवून दिला.
आयुष म्हात्रेची बॅट तळपली
आयुष म्हात्रेने २४ चेंडूत २ चौकार व ६ षटकारांसह अर्धशतक झळकावली आहे. आयुषने सलग २ षटकार लगावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. गेल्या अनेक सामन्यांमध्ये फेल ठरलेल्या कर्णधाराने अखेरीस वादळी खेळी करत मोठी कामगिरी केली आहे.
वैभव सूर्यवंशी झेलबाद
वैभव सूर्यवंशी नवव्या षटकात मोठा फटका खेळताना पहिल्या चेंडूवर झेलबाद झाला. वैभव २३ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ४० धावांची खेळी केली.
आयुष-वैभवची वादळी फटकेबाजी
आयुष म्हात्रे व वैभव सूर्यवंशीच्या जोडीने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत एक विकेट लवकर गमावल्यानंतर संघाचा डाव सावरला. दोघांनी मिळून ३९ चेंडूत ७६ धावांची भागीदारी रचली. यासह भारताने ८ षटकांत १ बाद ८७ धावा केल्या.
भारताला पहिला धक्का
आरोन जॉर्जने दुसऱ्या षटकात मेसन क्लार्कच्या गोलंदाजीवर दणदणीत षटकार खेचला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर जॉर्ज क्लीन बोल्ड होत माघारी परतला. यासह भारताने दोन षटकांत १ बाद १२ धावा केल्या आहेत.
भारताच्या डावाला सुरूवात
न्यूझीलंडने दिलेल्या १३० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडियाकडून आरोन जॉर्ज व वैभव सूर्यवंशीची जोडी उतरली आहे. तर कर्णधार आयुष म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर उतरणार आहे.
भारताला किती धावांचं लक्ष्य
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बुलावायोमध्ये होत असलेल्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. सामना आऊटफिल्ड ओली असल्यामुळे उशिरा सुरू झाल्याने ४७ षटकांचा झाला, पण ७ षटकं झाल्यानंतर पुन्हा सामना थांबवण्यात आला. त्यामुळे सामना ३७ षटकांचा करण्यात आला. यामुळे डीएलएस पद्धतीनुसार भारताला ३७ षटकांत १३० धावांचं लक्ष्य देण्यात आलं आहे.
न्यूझीलंड ऑल आऊट
न्यूझीलंडचा संघ ३६.२ षटकांत १३५ धावांवर सर्वबाद केलं आहे. भारताला आता विजयासाठी ३७ षटकांत डीएलएस मेथडनुसार १३६ धावा करायच्या आहेत. भारताकडून अंबरिशने सामन्यात ४ विकेट्स घेतल्या. तर हेनिल पटेलने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय खिलान पटेल, मोहम्मद एनान, कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. तर न्यूझीलंडकडून कॅलम सॅमसन याने नाबाद ३७ धावांची सर्वात मोठी खेळी केली. त्याशिवाय सेल्विन संजयने २८ धावा व जेकब कॉटरने २३ धावांचं योगदान दिलं.
विहान मल्होत्राचा शानदार झेल
अंबरिशने ३४व्या षटकात सेल्विन संजयला झेलबाद करत संघाला आठवी विकेट मिळवून दिली. सेल्विनने ३० चेंडूत ३८ धावा केल्या.
हेनिल पटेलच्या खात्यात नववी, दहावी विकेट
हेनिल पटेलने ३५व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर फ्लिनला क्लीन बोल्ड केलं. तर ३७व्या षटकात त्याने मॅसोन क्लार्कला क्लीन बोल्ड केलं. अंबरिशने या सामन्यात ४ विकेट्स घेतल्या.
सातवी विकेट
मोहम्मद एनानने २५व्या षटकातील दुसऱ्या चेंडूत जेबक कॉटरला झेलबाद करत संघाला सातवी विकेट मिळवून दिली. यासह २५ षटकांत ७ बाद ७२ धावा केल्या आहेत.
कनिष्कच्या खात्यात पहिली विकेट
कनिष्क चौहानने पाचव्या चेंडूवर जसकरन संधूला झेलबाद करत संघाला सहावी विकेट मिळवून दिली.
भारताचे गोलंदाज चमकले
अंबरीशने न्यूझीलंडच्या मार्को आल्पेला क्लीन बोल्ड करत भारताला चौथी विकेट मिळवून दिली. तर अंबरीशने या सामन्यातील त्याची तिसरी विकेट मिळवली आहे. तर पुढच्याच षटकात खिलान पटेलच्या गोलंदाजीवर अभिज्ञान कुंडूने कमालीच्या चपळाईने स्टंपिंग करत स्नेहहित रेड्डीला माघारी धाडलं. यासह १० षटकांत न्यूझीलंडचा संघ ५ विकेट्स गमावत २२ धावा करू शकला आहे.
किती वाजता सामना सुरू होणार?
अंडर-१९ वर्ल्डकपमधील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना ४ वाजता सुरू होणार आहे आणि बराच काळ सामन्यात व्यत्यय आल्याने आता हा सामना ३७ षटकांचा होणार आहे.
विकेट अन् सामना थांबवला
हेनिल पटेलने आठव्या षटकातील पहिल्या चेंडूवर आर्यन मानला पायचीत केलं आणि संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. यादरम्यान जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे सामना थांबवण्यात आला.
पाचव्या षटकात न्यूझीलंडला धक्का
पाचव्या षटकात अंबरीशने कर्णधार टॉम जोन्सला झेलबाद केलं आहे. आयुष म्हात्रेने कमालीचा झेल टिपला आहे. यासह ५ षटकांत २ बाद ९ धावा केल्या आहेत.
भारताच्या खात्यात पहिली विकेट
तिसऱ्या षटकात एस अंबरीशने न्यूझीलंडचा सलामीवीर हुय्गो बोगला झेलबाद केलं. विकेटच्या मागे अभिज्ञान कुंडूने चांगला झेल टिपला.
न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन
आर्यन मान, ह्यूगो बोग, टॉम जोन्स (कर्णधार), स्नेहिथ रेड्डी, मार्को आल्पे (विकेटकीपपर), जेकब कॉटर, जसकरण संधू, कॅलम सॅमसन, फ्लिन मोरे, सेल्विन संजय, मेसन क्लार्क
भारताची प्लेईंग इलेव्हन
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये हरिवंश सिंग पंघालियाच्या जागी अॅरोन जॉर्ज तर दीपेश देवेंद्रनच्या जागी मोहम्मद इन्नानला संधी मिळाली आहे.
वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), आरोन जॉर्ज, कनिष्क चौहान, आरएस अंबरिश, खिलान पटेल, हेनिल पटेल, मोहम्मद एनान
नाणेफेक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंडर-१९ वर्ल्डकप सामन्याची नाणेफेक भारतीय संघाने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंडचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. सामना निर्धारित वेळेपक्षा उशिराने सुरू झाल्यामुळे आता ४७ षटकांचा सामना होणार आहे.
भारत-न्यूझीलंड सामन्याची नाणेफेक उशिराने होणार
अंडर-१९ विश्वचषक २०२६ मधील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याची नाणेफेक उशिराने होणार आहे. बुलावायोमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे आऊटफिल्ड ओली झाली आहे, काही ठिकाणी ओले पॅच तयार झाल्याने सामन्याची नाणेफेक उशिराने होणार आहे.
भारत-न्यूझीलंड सामन्याची नाणेफेक किती वाजता होणार?
भारत आणि न्यूझीलंड अंडर-१९ विश्वचषक २०२६ सामन्याची नाणेफेक भारतीय वेळेनुसार १२.४५ वाजता होईल व सामन्याला १ वाजता सुरूवात होणार आहे.
न्यूझीलंडविरूद्ध भारताचा सामना
भारत आणि न्यूझीलंड हे १९ वर्षांखालील विश्वचषकात आज शनिवारी (२४ जानेवारी) आमनेसामने असतील. हा विश्वचषकातील २४ वा सामना असेल. भारताने त्यांचे दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडचे दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाले आहेत.
