IND vs PAK 2027 ODI World Cup Schedule Super 7 Matches: आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. २ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर २०२७ या कालावधीत दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणारी ही स्पर्धा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. या महास्पर्धेत एकाच गटात असलेल्या भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये तीन वेळा आमनेसामने लढत होण्याची शक्यता आहे. नव्या फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ कसे आमनेसामने येणार, जाणून घेऊया.
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरुषांच्या वनडे विश्वचषकात १४ संघ सहभागी होतील आणि एकूण ५७ सामने खेळवले जातील. २४ वर्षांच्या कालावधीनंतर वनडे विश्वचषक आफ्रिकन खंडात होणार आहे; यापूर्वी २००३ मध्ये तिथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या वर्षी भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली होती.
कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात म्हणजेच अ गटात समावेश केल्यामुळे या स्पर्धेची रंगत आणि उत्सुकता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या दोन दिग्गज संघांव्यतिरिक्त या गटात गतविजेता ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, यजमान झिम्बाब्वे आणि पात्रता फेरीतून येणारा एक संघ यांचाही समावेश आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकपमध्ये तीन सामने कसे होणार?
स्पर्धेचं नवीन स्वरूप अशा प्रकारे तयार करण्यात आलं आहे की, चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना तीन वेगवेगळ्या प्रसंगी पाहता येईल. यातील पहिला सामना ‘गट फेरी’मध्ये (group stage) निश्चित करण्यात आला असून, १० ऑक्टोबर रोजी जोहान्सबर्ग येथील ऐतिहासिक वँडरर्स स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमनेसामने येतील. मात्र, एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानच्या संघाला भारताचा कधीही पराभव करता आलेला नाही. विश्वचषकात या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत आठ वेळा सामने झाले आहेत आणि त्या प्रत्येक सामन्यात भारतानेच विजय मिळवला आहे.
गट टप्प्यातील सामने संपल्यानंतर, हे दोन्ही संघ ‘सुपर-७’ टप्प्यात पुन्हा आमनेसामने येऊ शकतात. गट फेरीची सांगता झाल्यावर, दोन्ही गटांतील अव्वल संघ ‘सुपर-७’ टप्प्यात प्रवेश करतील, जिथे सर्व संघ एकमेकांशी सामने खेळणार आहेत. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारत आणि पाकिस्तानचे संघ या टप्प्यापर्यंत पोहोचले, तर चाहत्यांना या दोघांमधील पुन्हा एकदा एक रोमांचक सामना पाहण्याची संधी मिळेल.
तिसरा आणि अत्यंत रोमांचक सामना बाद फेरीत म्हणजेच उपांत्य किंवा अंतिम सामन्यात होऊ शकतो. ‘सुपर-७’ फेरी संपल्यानंतर, गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. जर दोन्ही संघ पुढील फेरीत पोहोचले आणि आपापले बाद फेरीतील सामने जिंकले, तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य किंवा अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा लढत होऊ शकते.
