पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने पीसीबीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड २०२३ चा विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाणार नाही असे म्हणू शकते, परंतु सत्य हे आहे की त्यांच्यात तसे करण्याचे धैर्य नाही. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने आपल्याच देशाच्या क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांच्या धमकीला पोकळ म्हटले आहे, ज्यात पीसीबी प्रमुखांनी २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची चर्चा केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरं तर, अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनी मोठी प्रतिक्रिया दिली होती. जर टीम इंडिया आपल्या देशात खेळायला आली नाही, तर पाकिस्तानी संघही पुढच्या वर्षी एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाणार नाही, असं रमीज राजाने म्हटलं होतं.

पाकिस्तानी चॅनल उर्दू न्यूजशी बोलताना रमीज राजा म्हणाले की, “जर भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात आला नाही तर आम्ही विश्वचषक खेळण्यासाठी तिथे जाणार नाही. आमच्या बाजूनेही आक्रमकता सुरूच राहील. त्यात पाकिस्तान खेळला नाही तर कोण बघणार, असेही रमीझ राजा म्हणाले. रमीज राजा पुढे म्हणाले की, “आमची भूमिकाही आम्ही विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाही.”

हेही वाचा :   IND vs PAK: ‘योग्य वेळेची…’, रमीज राजाच्या वर्ल्डकप वक्तव्यावर भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे सडेतोड उत्तर

मात्र, रमीज राजा यांच्या वक्तव्यावर त्यांच्याच देशाचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने यूट्यूब चॅनलवर संवाद साधताना उपरोधिक टोला लगावत म्हटले की, पीसीबीमध्ये असे करण्याची हिंमत नाही. फिरकीपटू दानिश कनेरिया पुढे बोलताना म्हणाला की, “आयसीसीच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची हिंमत पीसीबीमध्ये नाही. दुसरीकडे पाकिस्तानने तिथे खेळायला न गेल्यास भारताची अजिबात हरकत नाही. त्यांच्याकडे खूप मोठी बाजारपेठ आहे ज्यामुळे भरपूर महसूल मिळतो. विश्वचषकासाठी भारतात न जाण्याचा पाकिस्तानवर खूप परिणाम होईल. विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ नक्कीच भारतात जाणार आहे. अधिकारी एवढेच म्हणतील की आयसीसीचा दबाव होता आणि त्यामुळे त्यांच्याकडे पर्याय नव्हता.”

हेही वाचा :   FIFA World Cup 2022: ‘एमबाप्पे हा एक उत्कृष्ट खेळाडू’, प्रशिक्षक डेशॅम्प्स यांनी डेन्मार्कच्या सामन्यानंतर केला कौतुकाचा वर्षाव

भारतीय क्रिकेट संघाने २००८ मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. २००८ आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानने केले होते. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आणि भारत कधीच पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला नाही. पाकिस्तानने शेवटचा भारत दौरा २०१३ मध्ये केला होता. यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय संबंध आणखी बिघडले आणि ही दोन्ही देशांमधील शेवटची मालिका ठरली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs pak boycott the world cup former pakistan cricketer danish kaneria mocks ramiz rajas threat avw
First published on: 27-11-2022 at 14:28 IST