IND vs PAK Controversy in T20 WC 2026: भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषक सामना १५ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. हा सामना होण्यापूर्वीदेखील मोठा गदारोळ सुरू होता. पाकिस्तान सरकारने पाकिस्तानी संघाला टी-२० विश्वचषकातील भारताविरूद्ध सामना खेळण्यासाठी मैदानावर न उतरण्याचे आदेश दिले होते. बांगलादेश संघाने आयसीसी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आयसीसी भूमिकेविरूद्ध पाकिस्तानने हा निर्णय घेतला होता. पण यानंतर आयसीसीने मध्यस्थी केला आणि पाकिस्तानने आपला निर्णय मागे घेतला. त्यामुळे आता भारत-पाकिस्तान सामना होणार आहे.

क्रिकेट मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात वाद झाला असं पाहायलाच नाही मिळत. क्रिकेट मैदानाबाहेर देखील भारत आणि पाकिस्तान देशांमधील संबंध सातत्याने तणावपूर्ण राहिले आहेत. मैदानाबाहेर घडलेल्या गोष्टीचे पडसाद क्रिकेटच्या मैदानावर आशिया चषकादरम्यान पाहायला मिळाले होते.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक २०२५ चे जेतेपद पटकावलं होतं. या स्पर्धेत तब्बल ३ वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. अंतिम सामन्यातही टीम इंडियाकडून तिलक वर्माने वादळी खेळी करत पाकिस्तानला नमवलं होतं आणि स्पर्धेचं जेतेपद पटकावलं.

आशिया चषक स्पर्धा होण्यापूर्वी २२ एप्रिव २०२५ ला काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी फिरण्यासाठी गेलेल्या लोकांना गोळी घालून त्यांची हत्या केली. यामध्ये तब्बल २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर पाकिस्तानविरूद्ध भारताने ऑपरेशन सिंदूर करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानने ओपन फायरिंग, ड्रोन अटॅक करत अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं होतं. या संपूर्ण प्रकारानंतर आशिया चषकामध्ये भारत-पाकिस्तान सामना होऊ नये. अशी चर्चा होती.

अखेरीस आशिया चषकात खेळण्यासाठी दोन्ही संघ आमनेसामने आले, तेव्हा भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला. सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू थेट ड्रेसिंग रूममध्ये परतले. मैदानावरही खेळाडूंनी एकमेकांशी चर्चा केली नाही. हँडशेकमुळे भारत-पाकिस्तानमधील मैदानावरील संबंध अधिक ताणले गेले आणि खेळाडूंमध्येही शाब्दिक संघर्ष पाहायला मिळाला.

भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत आशिया चषक २०२५ च्या जेतेपदावर मोहर उमटवली. भारतीय संघाने स्पर्धा जिंकल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून आशिया चषक ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. मोहसीन नक्वी हे पीसीबीचे प्रमुख असून ते पाकिस्तान सरकारमध्ये मंत्रीपदावर आहेत. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय संघाने पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन टाळलं होतं आणि त्यामुळेच संघाने मोहसीन नक्वींच्या हातून ट्रॉफी घेण्यासही नकार दिला.

मोहसीन नक्वींनी मात्र मीच ट्रॉफी देणार हा हट्ट करत अखेरीस त्यांनी इतर कोणाच्या हस्ते भारताला ट्रॉफी देऊ दिली नाही. भारतीय संघाने ट्रॉफीशिवाय विजयाचं सेलिब्रेशन केलं. अद्यापदेखील भारतीय संघाला आशिया चषकाची ट्रॉफी दिलेली नाही.