भारतीय संघाने अंडर-१९ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दुबईमध्ये खेळवल्या जात असलेल्या अंडर-१९ आशिया चषक २०२५ च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये फायनल होणार आहे. भारताने सेमीफायनलमध्ये श्रीलंका अंडर-१९ संघाविरूद्ध उत्कृष्ट कामगिरी करत ८ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. विहान मल्होत्रा व अरोन जॉर्ज यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला फायनलमध्ये नेलं. तर पाकिस्ताननेही बांगलादेशवर ८ विकेट्सने विजय मिळवला.

दुबईमध्ये पाऊस पडत असल्याने सेमीफायनलचा सामना होणार की नाही, याबाबत शंका होती. अखेरीस पावसाने विश्रांती घेतल्याने ५० ऐवजी सामना २०-२० षटकांचा करण्यात आला. यासह भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर फलंदाजी करताना श्रीलंकेच्या अंडर-१९ संघ फक्त १३८ धावा करू शकला. प्रत्युत्तरात भारताने १८ षटकांत २ बाद १३९ धावा करत सहज विजय मिळवला. यासह भारत आणि पाकिस्तान यांच्यात २१ डिसेंबर २०२५ ला सकाळी १०.३० वाजता हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

श्रीलंकेने दिलेल्या १३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खूपच खराब झाली. संघाचे स्टार सलामीवीर आयुष म्हात्रे ७ धावा तर वैभव सूर्यवंशी ९ धावा करत स्वस्तात बाद झाले. यानंतर अॅरोन जॉर्जने ४९ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ५८ धावांची खेळी केली. तर विहान मल्होत्राने ४५ चेंडूत ४ चौकार व २ षटाकारांसह ६१ धावांची शानदार खेळी केली. यासह भारताने १८ षटकांत महत्त्वपूर्ण विजय नोंदवला व अंतिम फेरीत धडक मारली.

श्रीलंकेची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. पण संघाच्या मधल्या फळीने चांगली कामगिरी करत १३८ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार विमत दिनसाराे ३२ धावांची शानदार खेळी केली. तर चमिका हिनातिगालाने ४२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर सेथमिका सेनेवीरात्ने यानेही ३० धावांची खेळी केली. तर भारताच्या सर्व गोलंदाजांनी विकेट्स घेत श्रीलंकेला मोठी धावसंख्या करू दिली नाही. भारताकडून किशन कुमार, दिपेन देवेंद्रन व खिलान पटेल यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. तर कनिष्क चौहान व हनिल पटेल यांनी २-२ विकेट्स घेतल्या.

बांगलादेश व पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचा दुसरा सामना खेळवला गेला. पावसामुळे हा सामना देखील २७ षटकांचा खेळवला गेला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २६.३ षटकांत सर्वबाद होत १२१ धावा केल्या. तर पाकिस्तानने २ बाद १२२ धावा करत सहज विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली.