scorecardresearch

Premium

Waqar Younis: विश्वचषक २०२३च्या भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वकार युनूसचे सूचक विधान; म्हणाला, “टीम इंडियाच्या तुलनेत आम्ही…”

Waqar Younis on Team India: विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत वकार युनूसने टीम इंडियाबाबत मोठे भाष्य केलं आहे. त्याचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियात खूप चर्चिले जात आहे.

IND vs PAK: Pakistan is a weaker team than India Waqar Younis before India vs Pakistan World Cup clash
विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत वकार युनूसने टीम इंडियाबाबत मोठे भाष्य केलं आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Waqar Younis on Team India: १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांवर दबाव असेल, असा विश्वास अनुभवी वेगवान गोलंदाज वकार युनूसने व्यक्त केला आहे. क्रिकेटमधील वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्यात हे दोन प्रतिस्पर्धी भिडणार आहेत.

भारतीय संघ सलग आठव्यांदा पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक मालिकेतील सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार असताना दुसरीकडे, पाकिस्तानची नजर भारताविरुद्धच्या वन डे विश्वचषकातील पहिल्या विजयाकडे असेल. नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानशी दोनदा सामना झाला होता, ज्यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर १२८ धावांनी दणदणीत विजय नोंदवला होता.

पाकिस्तानी संघ भारतापेक्षा कमकुवत: माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस

वकार युनूसने विश्वचषक स्पर्धेपूर्वी स्वतःच्याच संघाला कमकुवत म्हटल्याने सोशल मीडियात एकच चर्चा सुरु झाली आहे. वकार म्हणाला की, “पाकिस्तान हा भारतापेक्षा कमकुवत संघ आहे आणि त्यामुळे त्याच्यावर दबाव येईल.” युनूसने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “आम्हाला माहीत आहे की भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सर्वात मोठा असेल. जेव्हा तुम्ही अहमदाबादमध्ये खेळता तेव्हा तुम्हाला तुमच्या मज्जातंतूंवर (नर्व्ज) नियंत्रण ठेवावे लागते, तुम्ही जर गोंधळून गेलात तर मग टीम इंडिया तुमच्यावर भारी पडेल. एवढेच नाही तर पाकिस्तान भारतापेक्षा कमकुवत संघ असल्यामुळे त्यांच्यावर दबाव हा जास्त असेल. तसेच, भारतावरही दडपण असेल कारण मैदानात उपस्थित प्रेक्षकांची गर्दी दोन्ही संघांवर दबाव टाकेल.”

हेही वाचा: Asian Games 2023: भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्ण पदक! पुरुष संघाने स्क्वॉशमध्ये पाकिस्तानचा अंतिम फेरीत केला पराभव

अलीकडच्या कामगिरीच्या आधारे भारत हा चांगला संघ असल्याचे युनूसने मान्य केले. टीम इंडियाने नुकताच आशिया चषक जिंकला आणि विश्वचषकापूर्वी एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. तो म्हणाला, “जर आपण केवळ सांघिक कामगिरीच्या आधारे मूल्यांकन केले तर भारत निश्चितपणे एक चांगला संघ आहे. टीम इंडियाच्या तुलनेत आम्ही या विश्वचषकात कमकुवत आहोत.”

पाकिस्तान संघाबाबत वकार युनूस पुढे म्हणाला की, “नसीम शाहची अनुपस्थिती हा विश्वचषक पाहता पाकिस्तानी संघासाठी मोठा धक्का आहे. मला जर पाकिस्तानच्या विश्वचषक जिंकण्याच्या शक्यतेबाबत विचारल्यास ते तर ते अंडर डॉग आहेत. नसीम शाहच्या अनुपस्थिती संघाला जाणवणार असून त्याचा खूप मोठा फटका पाकिस्तानला बसणार आहे. कारण, नसीम आणि शाहीन आफ्रिदी नवीन चेंडूने एकमेकांना पूरक आहेत. अशावेळी बाबरची कॅप्टन्सी कस लागणार हे निश्चित.”

हेही वाचा: IND vs PAK: ‘शत्रू राष्ट्र’ या विधानावर झका अश्रफ यांनी घेतला यू-टर्न, पीसीबीने केले स्पष्टीकरण जाहीर; म्हणाले, “पारंपारिक प्रतिस्पर्धी…”

पाकिस्तान विश्वचषक संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, (यष्टीरक्षक) मोहम्मद वसीम, आगा सलमान, सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी, उसामा मीर.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs pak india pakistan clash in world cup 2023 said we are weak compared to team india avw

First published on: 30-09-2023 at 16:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×