अंडर-१९ विश्वचषक २०२६ मध्ये सुपर-६ मधील सामने खेळवले जात आहेत. भारताने सुपर-६ मधील झिम्बाब्वेविरूद्ध पहिला सामना २०४ धावांनी जिंकला होता. तर आता दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरूद्ध होणार आहे. सेमीफायनलच्या दृष्टीने भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे या सामन्याची प्लेईंग इलेव्हन कशी असणार, जाणून घेऊया.

अंडर-१९ विश्वचषक २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता खेळवला जाईल. भारतीय संघ आतापर्यंत स्पर्धेत अपराजित राहिला आहे. संघाने गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकले तर सुपर-६मधील पहिला सामनाही जिंकला.

भारत-पाकिस्तान सामन्यातील विजयामुळे भारत ८ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचेल, तर पाकिस्तान हा सामना मोठ्या फरकाने जिंकून ६ गुण मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि जर त्यांचा नेट रन रेट चांगला राहिला तर संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी आहे, म्हणजेच हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. भारत-पाकिस्तान सामना यासाठी देखील महत्त्वाचा आहे, कारण डिसेंबर २०२५ मध्ये पाकिस्तानने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत करत जेतेपद पटकावलं होतं. भारताकडे त्या पराभवाचा बदल घेण्याची संधी आहे.

भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यांनी आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत. भारत हाच फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. भारताकडून वैभव सूर्यवंशीसह आरोन जॉर्ज डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे, तर कर्णधार आयुष म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर आणि विहान मल्होत्रा ​​चौथ्या क्रमांकावर असेल. तर वेदांत त्रिवेदी पाचव्या क्रमांकावर उतरेल.

भारताची खरी ताकद अभिज्ञान कुंडू, कनिष्क चौहान, आरएस अंबरिश यांच्यासारख्या संघातील अष्टपैलू खेळाडूंच्या रूपात आहे आणि या खेळाडूंमध्ये सामन्याचा रोख बदलण्याची ताकद आहे. जे गेल्या काही सामन्यांमध्ये आपण पाहिलं आहे. गोलंदाजीची जबाबदारी खिलन पटेल, हेनिल पटेल, मोहम्मद एनान यांसारख्या खेळाडूंवर असेल.

पाकिस्तानविरूद्ध अंडर-१९ वर्ल्डकप सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), आरोन जॉर्ज, कनिष्क चौहान, आरएस अंबरिश, खिलन पटेल, हेनिल पटेल, मोहम्मद एनान.