India vs Pakistan Under 19 World Cup Match Live Cricket Score Updates: अंडर १९ विश्वचषक २०२६ मधील सुपर सिक्स सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५८ धावांनी पराभव केला आहे. भारताच्या फिरकीपटूंनी पुन्हा एकदा सामन्याचा रोख बदलला. एका घडीला पाकिस्तान सामन्यात पुढे होता आणि विजयाचा जवळ होता. पण भारताच्या गोलंदाजांनी पुनरागमन करत विजय निश्चित केला.

आयुष म्हात्रेच्या खात्यात तिसरी विकेट

आयुषने ४२व्या षटकात मोमिनला झेलबाद करत सामन्यातील तिसरी विकेट मिळवली. आयुष फलंदाजीदरम्यान शून्यावर बाद झाला, पण त्याने गोलंदाजीत मात्र मॅचविनिंग योगदान दिलं आहे.

कनिष्क चौहानचा अद्भुत झेल

खिलन पटलेच्या ४१व्या षटकात पाकिस्तानला सातवा धक्का बसला. अब्दुल सुभान मोठा फटका खेळायला गेला आणि कनिष्क बरंच अंतर धावत येत त्याने कमालीचा रनिंग झेल टिपला. यासह पाकिस्तानला आता ५४ चेंडूत ७० धावांची गरज आहे.

विहान मल्होत्राच्या खात्यात विकेट

विहान मल्होत्राने ३७व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अली हसन बलोचला झेलबाद करत संघाला सहावी विकेट मिळवून दिली.

आयुषच्या खात्यात अजून एक विकेट

आयुष म्हात्रेने ३६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कमालीचा चेंडू टाकत ६६ धावा करत सेट केलेल्या उस्मानला पायचीत करत बाद केलं. यासह ३६ षटकांत पाकिस्तानने ५ बाद १६९ धावा केल्या.

भारत अंडर-१९ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये

पाकिस्तानविरूद्धचा सामना संपण्यापूर्वीच टीम इंडिया अंडर-१९ विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. पाकिस्तान संघ भारताने दिलेलं २५२ धावांचं लक्ष्य ३३.३ षटकांत गाठण्यात अपयशी ठरल्याने टीम इंडिया पुढील फेरीत गेली आहे. सविस्तर बातमी खालच्या लिंकवर क्लिक करत वाचा.

भारताची U19 वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये धडक! पाकिस्तानविरूद्ध सामना सुरू असतानाच टीम इंडिया कशी झाला क्वालिफाय?

आयुष म्हात्रेने संघाला मिळवून दिली विकेट

आयुष म्हात्रे स्वत: ३२व्या षटकात गोलंदाजी करायला आला आणि पहिल्याच चेंडूवर त्याने संघाला विकेट मिळवून दिली. आयुषचा चेंडू हुसैनच्या बॅटची कड घेत अभिज्ञानच्या हातात गेला आणि तो झेलबाद झाला.

तिसरी विकेट

आर एस अंबरीशने ३०व्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार फरहान युसूफला माघारी धाडलं. यासह ३० षटकांत पाकिस्तानने ३ बाद १५३ धावा केल्या आहेत.

पाकिस्तानने २५ षटकांत किती धावा केल्या?

पाकिस्तानने दोन विकेट्स गमावल्यानंतर आता फरहान व उस्मान यांनी संघाचा डाव उचलून धरला आहे. या दोघांनीही अर्धशतकी भागीदारी केली आहे. तर आतापर्यंत २५ षटकांत संघाने २ बाद १२९ धावा केल्या आहेत.

कनिष्कच्या खात्यात मोठी विकेट

कनिष्क चौहान १७वं षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने षटकातील अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानची ६३ धावांची भागीदारी तोडत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. कनिष्कच्या गोलंदाजीवर हमजा स्वीप शॉट खेळायला गेला पण चेंडू थेट स्टंपवर आदळल्याने क्लीन बोल्ड झाला.

पाकिस्तानच्या १० षटकांत किती धावा?

समीर मिन्हालसच्या विकेटनंतर हमजा व उस्मान यांनी संघाचा डाव सावरला आहे. दीपेश देवेंद्रनच्या नवव्या षटकात आरोन जॉर्जने उस्मानचा झेल सोडला. यासह पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये १ बाद ५६ धावा केल्या आहेत.

भारताला मिळाला ब्रेकथ्रू

हेनिल पटेलची पहिल्या षटकाच चांगलीच धुलाई केली होती. स्पेलमधील पुढच्या षटकात समीर मिन्हासने चौकार खेचला होता. पण पुढच्या चेंडूवर हेनिलने कमालीचा चेंडू टाकत त्याला पायचीत केलं आणि संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

पाकिस्तानची चांगली सुरूवात

भारताने दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानकडून समीर मिन्हास व हमजा जहूर ही जोडी उतरली आहे. समीरने पहिल्याच षटकात चौकार खेचला. तर हेनिल पटेलच्या दुसऱ्या षटकात हमजाने ३ चौकार लगावत १३ धावा कुटल्या. यासह २ षटकांत पाकिस्तानने १८ धावा केल्या.

भारत ऑल आऊट

भारतीय संघ ४९.५ षटकांत सर्वबाद झाला. भारताकडून मधल्या फळीतील व खालच्या फळीतील फलंदाजांनी चांगली झुंज देत संघाला २५० धावांच्या पलीकडे नेला. वेदांत त्रिवेदीने सर्वाधिक ६८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर विहान मल्होत्राने २१ धावांचं, अभिज्ञानने १६ धावांच तर अंबरिशने २९ धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या षटकांमध्ये खिलन पटेल व कनिष्क चौहान यांनी महत्त्वपूर्ण खेळी केल्या. खिलनने १५ चेंडूत २१ धावा केल्या. तर कनिष्कने २९ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ३५ धावा केल्या. यासह भारताने २५२ धावांचा डोंगर उभारला आणि पाकिस्तानला विजयासाठी २५३ धावांचं आव्हान दिलं. पाकिस्तानला जर सेमीफायनल गाठायची असेल तर २५२ धावांचं लक्ष्य ३३.३ षटकांत गाठावं लागणार आहे.

अखेरच्या षटकात दोन विकेट्स

सुभानच्या अखेरच्या षटकात भारताने दोन विकेट्स गमावल्या. खिलन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात क्लीन बोल्ड झाला. तर कनिष्क मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. तर एक धाव चोरण्याच्या प्रयत्नात भारत अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर सर्वबाद झाला.

खिलन-कनिष्कची फटकेबाजी

कनिष्क चौहान व खिलन पटेल यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाला २५० धावांचा पल्ला गाठून दिला. अखेरच्या षटकांमध्ये दोघांनीही चौकार-षटकारांचा पाऊस पाडला.

कनिष्क चौहानची शानदार फटकेबाजी

कनिष्क चौहानने ४७व्या षटकात मोहम्मद सय्यमच्या गोलंदाजीवर ३ चौकार लगावत १४ धावा कुटल्या. यासह टीम इंडिया २५० धावांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या ४७ षटकांत संघाने २२७ धावा केल्या आहेत.

भारताच्या २०० धावा पूर्ण

भारताने ४४व्या षटकात २०० धावांचा पल्ला गाठला. पण अखेरच्या चेंडूवर अंबरीशच्या बॅटची कड घेत चेंडू विकेटकिपरने टिपला. यासह भारताला सातवा धक्का लागला. यासह आता ६ षटकांचा सामना शिल्लक आहे.

वेदांत त्रिवेदी झेलबाद

४१व्या षटकात मोमिन कमरने बाऊन्सर टाकत सेट असलेल्या वेदांत त्रिवेदीला झेलबाद केलं. वेदांतने ९८ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह ६८ धावांची खेळी केली. यासह बारताने ४२ षटकांत ६ बाद १८९ धावा केल्या आहेत.

अंबरिश-वेदांतने सावरला संघाचा डाव

अभिज्ञान कुंडू बाद झाल्यानंतर अंबरिश व वेदांत त्रिवेदी यांनी संघाचा डाव सावरला आहे. यासह ४० षटकांत भारताने ५ बाद १८१ धावा केल्या आहेत.

अभिज्ञान कुंडू झेलबाद

अली हसन बलोचने ३३व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अभिज्ञानला झेलबाद केलं. मोठा फटका खेळणं अभिज्ञानला महागात पडलं आणि त्याने विकेट गमावली. यासह भारताने ३३ षटकांत ५ बाद १४९ धावा केल्या आहेत.

वेदांत त्रिवेदीचं महत्त्वपूर्ण अर्धशतक

मधल्या फळीतील फलंदाज वेदांत त्रिवेदीने संयम व परिणामी आक्रमक फटके खेळत ७४ चेंडूत २ चौकार एक षटकारासह अर्धशतक पूर्ण केलं आहे. यासह ३० षटकांत भारताने ४ बाद १४० धावा केल्या आहेत.

अभिज्ञान कुंडूला मिळालं जीवदान

मोहम्मद सय्यमच्या ३०व्या षटकातील चौथ्या चेंडूवर अभिज्ञान विकेटकिपरकडून झेलबाद झाला. पण पंचांनी मात्र हा नो बॉल देत अभिज्ञान नाबाद राहिला. पाकिस्तानच्या संघाला मात्र याचा मोठा धक्का बसला आणि त्या फ्री हिटवर अभिज्ञानने चौकार खेचला.

विहान मल्होत्रा झेलबाद

विहान मल्होत्रा २४व्या षटकात स्ट्रेट शॉट मारण्याच्या प्रयत्नात गोलंदाजाच्या हातात झेल देऊन बसला. विहान व वेदांत यांनी सावध फलंदाजी करत ६३ धावांची भागीदारी रचली होती. यासह भारताने २५ षटकांत ४ बाद ११० धावा केल्या आहेत.

विहान-वेदांतने सावरला डाव

भारताने लागोपाठ ३ विकेट्स गमावल्यानंतर भारताचे फलंदाज विहान मल्होत्रा व वेदांत त्रिवेदी यांनी सावध फलंदाजी करत संघाचा डाव सावरला आहे. यासह भारताने २० षटकांत ३ बाद ९४ धावा केल्या आहेत. विहान २० धावा तर वेदांत २१ धावा करत मैदानावर कायम आहेत.

आरोन जॉर्ज क्लीन बोल्ड

अब्दुल सुभानने नवव्या षटकातील पहिल्या चेंडूवर आरोन जॉर्जला क्लीन बोल्ड करत संघाला तिसरा धक्का दिला. भारताने लागोपाठ तीन मोठे विकेट्स गमावले आहेत. यासह भारताने ९ षटकांत ३ बाद ४७ धावा केल्या आहेत.

आयुष म्हात्रे झेलबाद

मोहम्मद सय्यमने आठव्या षटकात वैभव सूर्यवंशीनंतर आयुष म्हात्रेलाही झेलबाद करत माघारी पाठवलं. आयुष म्हात्रे फटका खेळायला गेला आणि चेंडू बॅटची कड घेत विकेटकिपरच्या हातात गेला. यासह भारताला दुसरा मोठा धक्का बसला.

वैभव सूर्यवंशीची विकेट

वैभव सूर्यवंशी मोठा फटका खेळायला गेला आणि चेंडू हवेत उंच उडाला, पण कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर रनआऊटची संधीही गमावली. पण पुढच्या चेंडूवर वैभव सूर्यवंशीच्या बॅटची कड घेत चेंडू विकेटच्या मागे गेला आणि तो झेलबाद झाला.

पाच षटकांत किती धावा केल्या?

वैभव सूर्यवंशी व आरोन जॉर्ज यांनी सावध फलंदाजी करत संधी मिळेल तिथे चौकारांची फटकेबाजी केली. यासह ५ षटकांत भारताने एकही विकेट न गमावता ३४ धावा केल्या आहेत.

सामन्याला सुरूवात

भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताकडून वैभव सूर्यवंशी व आरोन जॉर्जची जोडी मैदानावर आहे. तर आशिया चषकात वैभव-आयुषच्या जोडीशी वाद घालणाऱ्या अली रजाने गोलंदाजी केली.

भारत अंडर-१९ प्लेइंग इलेव्हन:

आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), वेदांत त्रिवेदी, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन

पाकिस्तान अंडर-१९ प्लेइंग इलेव्हन:

हमजा जहूर (यष्टीरक्षक), समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसफ (कर्णधार), हुजैफा एहसान, अली हसन बलोच, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम, अली रझा

नाणेफेक

भारत-पाकिस्तान अंडर-१९ वर्ल्डकप सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारताच्या कर्णधाराने सांगितलं की, संघाचा प्रथम फलंदाजी कऱण्याचा निर्णय घेणार होता.

किती वाजता सुरू होणार सामना?

भारत पाकिस्तान अंडर-१९ विश्वचषक २०२६चा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.०० वाजता सुरू होईल आणि नाणेफेक दुपारी १२.३० वाजता असेल.