टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघांमधील हायव्होल्टेज लढत कोलंबोमध्ये सुरू आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. यादरम्यान अभिषेक शर्मा डकवर बाद झाला असून इशान किशन व तिलक वर्मा यांनी संघाचा डाव सावरला आहे. सर्वांच्या नजरा सध्या या मोठ्या लढतीकडे असताना एका माजी खेळाडूने मात्र धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
सध्याच्या भारत-पाकिस्तान सामन्यांवर टीका करत त्याला “तमाशा” असं या माजी दिग्गज खेळाडूने म्हटलं आहे. या सामन्याचं आयोजन अयशस्वी होऊ शकत नाही इतकं या सामन्याचं स्तोम माजलं आहे, असं त्यांनी म्हटलं. इतकेच नव्हे तर भारत-पाकिस्तान सामन्यांऐवजी इटली आणि नेपाळ यांच्यातील सामने कव्हर करणं मला अधिक आवडेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
The Times या वृत्तपत्रातील आपल्या स्तंभलेखात इंग्लंडचे माजी क्रिकेटपट मायकेल अथर्टन यांनी लिहिलं की, “हा असा सामना बनला आहे की जो अपयशी ठरू शकत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू राहावं आणि त्याचं अर्थकारण यादृष्टीने हा सामना महत्त्वाचा झाला आहे. मैदानावर काय होतं यापेक्षाही सामन्याआडून राजकीय बदला घेणं हेच होताना दिसत आहे.”
ते पुढे म्हणाले, “पुढील एक-दोन दिवसांत नेहमीप्रमाणे प्रचंड उत्सुकता आणि तापलेले वातावरण पाहायला मिळेल. या सामन्याकडे कोट्यवधी प्रेक्षकांचे लक्ष लागले असल्याच्या बातम्या येतील आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले जाईल. पण वस्तुस्थिती अशी आहे की अलीकडे हा सामना दुःखद तमाशा बनला आहे, मैदानावर तो एकतर्फी होत चालला आहे, तर मैदानाबाहेर निकालाचा दिखाऊ पद्धतीने वापर केला जातो.”
अॅथर्टन यांनी पुढे लिहिलं, “कधीकाळी हा असा सामना होता की कोणताही पत्रकार किंवा समालोचक कव्हर करण्यासाठी उत्सुक असायचा, कारण तो क्रिकेटमधील सर्वात मोठा आणि परिणामकारक सामना मानला जात होता. पण या आठवड्यात प्रामाणिकपणे सांगायचं तर नेपाळ आणि इटली यांच्यातील सामने कव्हर करताना अधिक समाधान मिळाले.”
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर पहिल्यांदाच आमनेसामने आले आहेत. त्या अंतिम लढतीत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला होता. सामन्यानंतर भारताने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. आजपर्यंत भारताला ती ट्रॉफी औपचारिकरित्या मिळालेली नाही, अशीही चर्चा आहे.
दोन्ही संघांमधील संबंध यानंतर अधिक तणावपूर्ण झाल्याचे दिसून आले. टी-२० विश्वचषकातून बांगलादेश बाहेर पडल्यानंतर पाकिस्तान सरकारने बांगलादेशच्या समर्थनार्थ भारताविरुद्धचा सामना बहिष्कृत करण्याची घोषणा केली होती. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात बैठक झाल्यानंतर पाकिस्तानने आपला निर्णय बदलत सामना खेळण्यास होकार दिला.

