महिला आशिया चषक २०२६ मधील नवव्या सामन्यात, भारताने पाकिस्तानचा डाव १८.१ षटकांत ५५ धावांत गुंडाळला. इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या पुरुष संघाला नामुष्कीचा सामना करावा लागत असतानाच, दुबईत महिला संघाने लाजिरवाणी कामगिरी केली आहे. भारताने पाकिस्तानला टी-२० सामन्यात अवघ्या ५५ धावांवर सर्वबाद केलं, महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पाकिस्तानच्या संघाची ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.
पाकिस्तानच्या महिला संघाची ही टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी पाकिस्तानची सर्वात कमी धावसंख्या ५६ धावा इतकी होती; २०२४ मध्ये दुबई येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्यांचा संघ ११.४ षटकांत ५६ धावांवर बाद झाला होता.
आशिया चषकातील या सामन्यात श्री चरणी, प्रेमा रावत आणि दीप्ती शर्मा या फिरकी गोलंदाजांच्या त्रिकुटाने पाकिस्तानी फलंदाजांना क्रीजवर स्थिरावण्याची संधीच दिली नाही आणि सलग तिसऱ्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला ७० धावांच्या आत सर्वबाद केलं.
भारताविरुद्ध सामन्याची नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. पाचव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर, संघाची धावसंख्या २७ असताना त्यांना पहिला धक्का बसला; शफाली वर्माने १३ धावा करणाऱ्या मुनीबा अलीला बाद केलं. त्यानंतर एकापाठोपाठ एक विकेट्सच्या रांगा लागल्या.
पहिल्या विकेटनंतर श्री चरणीने अवघ्या सात चेंडूंमध्ये तीन बळी घेत पाकिस्तानची दाणादाण उडवली. तिने गुल फिरोझा (०), सवाल झुल्फिकार (१४) आणि आयेशा जफर (२) यांना बाद केलं. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रेमा रावतने सदाफ शमासला (३ धावा) बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दीप्ती शर्माने फातिमा सानाला बाद केलं; फातिमाला या सामन्यात खातंही उघडता आलं नाही. पाकिस्तानसाठी धावांच्या दृष्टीने ती अखेरची आशा होती.
९.१ षटकांत पाकिस्तानची धावसंख्या ६ बाद ३५ अशी होती. त्यानंतर आयमन फातिमा धावबाद झाली, ज्यामुळे पाकिस्तानच्या अडचणीत आणखी भर पडली. १३.१ षटकांत ४५ धावांवर पाकिस्तानला सातवा धक्का बसला. त्यानंतर प्रेमा रावतने उम्म-ए-हानीला बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि पाकिस्तानला आठवा झटका दिला; त्यावेळी १४.४ षटकांत त्यांची धावसंख्या ४८ होती.
प्रेमा रावतने नशरा संधूला तंबूत धाडत तिने संघाला नववा धक्का दिला; त्यावेळी १६.५ षटकांत संघाची धावसंख्या ५४ धावा होती. दीप्ती शर्माने शेवटची विकेट घेतली, ज्यामध्ये तुबा हसन ९ धावा करून बाद झाली. भारतासाठी श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर दीप्ती शर्माने दोन आणि शफाली वर्माने एक बळी घेतला.
