IND vs PAK Pakistan U19 won by 44 runs against India U19 : एकोणीस वर्षाखाली आशिया चषक २०२४ मध्ये, भारतीय क्रिकेट संघाला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून भारताला २८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु प्रत्युत्तरात भारतीय संघ ४७.१ षटकात २३७ धावांवरच गारज झाला. ज्यामुळे भारतीय संघावर सलामीच्या सामन्यातच कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून ४४ धावांनी पराभूत होण्याची नामुष्की ओढवली.
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी खूपच खराब झाली. लक्ष्याचा पाठलाग करताना निखिल कुमारशिवाय भारताचा अन्य कोणताही खेळाडू क्रीजवर टिकू शकला नाही. टीम इंडियासाठी निखिल कुमारने ७६ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि ३ षटकारही मारले. निखिलाशिवाय भारतीय संघाची संपूर्ण फलंदाजीच फ्लॉप ठरली. भारताविरुद्ध २८१ धावांचा बचाव करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघाची गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट होती. पाकिस्तानकडून अली रझाने सामन्यात सर्वाधिक तीन बळी घेतले. याशिवाय अब्दुल सुभान आणि फहान उल हक यांनीही प्रत्येकी दोन गडी बाद केले. नावेद अहमद खान आणि उस्मान खान यांनीही प्रत्येकी एक गडी बाद केला.
शाहजेब खानने पाकिस्तानसाठी साकारली शतकी खेळी –
एकोणीस वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज शाहजेब खानने अप्रतिम कामगिरी केली. पाकिस्तानकडून शाहजेब खानने १५९ धावांची धमाकेदार शतकी खेळी केली. या डावात शाहजेबने पाकिस्तानसाठी १४७ चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये त्याने १० षटकार आणि ५ चौकारही मारले. यासह शाहजेब एकोणीस वर्षाखालील क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा पाकिस्तानचा फलंदाज ठरला आहे.
भारतीय संघाची गोलंदाजीही राहिली साधारण –
शाहजेबशिवाय उस्मान खाननेही पाकिस्तानसाठी शानदार फलंदाजी केली. उस्मान खानने ९४ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ६० धावांची खेळी केली. उस्मानसह शाहजेबनेही पहिल्या विकेटसाठी १६० धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. यामुळेच पाकिस्तानी संघ भारताविरुद्ध फलंदाजी करताना २८१ धावा करू शकला. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजीही सामान्य होती. भारताकडून समर्थ नागराज हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने १० षटकांच्या स्पेलमध्ये ४५ धावांत ३ बळी घेतले. याशिवाय आयुष महात्रेने २, तर किरण कोरमले आणि युद्ध जीत गुहा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.