Shoaib Akhtar : टी-20 विश्वचषकात काल भारत आणि पाकिस्तानचा सामना खेळण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी संघाला ११४ धावांमध्ये गुंडाळलं. श्रीलंकेतील कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने १७५ धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी १७६ धावांचं लक्ष्य ठेवलं पण ११४ धावांमध्ये पाकिस्तानचा सगळा संघ तंबूत परतला. या पराभवानंतर पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानी संघावर जोरदार टीका केली आहे.

शोएब अख्तरबाबत पाक संघावर चांगलाच संतापला

भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तरने महत्वाचं विधान केलं आहे. भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी आला आहे. पाकिस्तान ज्या पद्धतीने खेळला, त्याप्रमाणे पाकिस्तान सामन्यात कुठेही नव्हता. आम्हाला शाहीन शाह आफ्रिदीकडून २३ धावांची गरज नाही, आम्हाला त्याच्याकडून विकेटची गरज आहे, असं म्हणत शोएब अख्तरने शाहीन अफ्रिदीसह पाकिस्तानचा चांगलेच सुनावले. तसेच भारतीय संघाला कोणता संघ रोखू शकत असेल तर तो कदाचित इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया असेल, असा दावाही शोएब अख्तरने यावेळी केला. बाबरला जे बनायचं होतं तो बनला. आता काय बोलणार? टी २० स्कीलने, कौशल्याने खेळण्याचा खेळ आहे. बॅट आणि बॉल खेळता आला म्हणजे क्रिकेट आलं असं नाही, असं म्हणत बाबर आझमवरही शोएबने टीका केली आहे.

भारत पाक सामना कायमच असतो चर्चेत

वर्ल्डकप स्पर्धेतला असो किंवा कुठल्याही क्रिकेट स्पर्धेतला भारत-पाकिस्तान सामना नेहमीच चर्चेत असतो. मात्र प्रत्यक्ष मैदानावर हा सामना एकतर्फी, एकसुरीच ठरतो हे पाकिस्तानने रविवारी पुन्हा एकदा सिद्ध केलं. कोलंबोतल्या आर.प्रेमदासा स्टेडियमच्या संथ आणि धीम्या खेळपट्टीवर भारतीय संघाने १७५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकिस्तानने पॉवरप्लेमध्येच तीन शिलेदार गमावले. यानंतर सातत्याने विकेट्स गमावत पाकिस्तानच्या संघाने मान टाकली. त्यांचा डाव .. आटोपला. पाकिस्तानने मूळ योजनेनुसार या लढतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक नुकसान शक्यता आणि आयसीसीची मध्यस्थी यानंतर पाकिस्तानने ही लढत खेळण्याचा निर्णय घेतला. अंतर्गत बंडाळ्यांमुळे पाकिस्तानच्या टीमला सर्वसमावेशक खेळ करणं जमलं नाही आणि त्यांच्या नावावर पुन्हा एकदा ‘पराभूत’ असा शिक्का बसला. या विजयासह भारतीय संघाने तीनपैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे बाद फेरीचा मार्ग सुकर झाला आहे. दुसरीकडे पाकिस्तानला बाद फेरीसाठी संघर्ष करावा लागणार आहे. या पराभवानंतर शोएब अख्तर मात्र चांगलाच संतापला आहे.