scorecardresearch

Ind vs Pak T-20 : भारत-पाकिस्तान सामन्याला रामदेव बाबांनी केला तीव्र विरोध, प्रतिक्रिया विचारताच म्हणाले…!

भारत विरुद्ध पाकिस्तान टी-२० वर्ल्डकपमधील सामन्याला योगगुरू बाबा रामदेव यांनी विरोध केला आहे.

Ind vs Pak T-20 : भारत-पाकिस्तान सामन्याला रामदेव बाबांनी केला तीव्र विरोध, प्रतिक्रिया विचारताच म्हणाले…!
योगगुरू बाबा रामदेव (संग्रहीत छायाचित्र)

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आज टी-२० विश्वचषकाच्या मंचावर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. दोन्ही देशांमध्ये दहशतवाद आणि काश्मीरच्या मुद्द्यावर संबंध ताणले गेले असताना इतर वेळी हे दोन संघ क्रिकेटचे सामने खेळत नाहीत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्वरुपाच्या बहुदेशीय टुर्नामेंटमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात. यंदा टी-२० वर्ल्डकपमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याची फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात चर्चा सुरू होती. आज हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार असल्यामुळे त्याची देशभर उत्सुकता आहे, मात्र, या सामन्यावर अजूनही विरोधाचा सूर उमटत आहे.

योगगुरू रामदेव बाबा त्यांच्या भूमिका आणि विधानांमुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी घेतलेल्या राजकीय भूमिका विशेष चर्चेत राहिल्या आहेत. मात्र, आता योगगुरू रामदेव बाबांनी क्रिकेटविषयी आपलं मत व्यक्त केलं असून भारत आणि पाकिस्तान यांच्यात होऊ घातलेल्या सामन्याबाबत दोन्ही देशांमधील संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. योगगुरू रामदेव बाबा शनिवारी नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी विमानतळावरच त्यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घालून प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी भारत-पाकिस्तान टी-२० सामन्याविषयी त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

“दोन गोष्टी सोबत चालू शकत नाहीत”

आजच्या सामन्याविषयी पत्रकारांनी रामदेव बाबांना विचारणा केली असता त्यांनी याला विरोध केला आहे. “भारत आणि पाकिस्तानचा सामना अशा परिस्थितीत होणं हा आपलं राष्ट्रहित आणि राष्ट्रधर्माच्या विरुद्ध आहे. एकीकडे क्रिकेटचा खेळ आणि दुसरीकडे दहशतवाद्यांचा खेळ हे दोन्ही सोबत चालू शकत नाही”, असं रामदेव बाबा म्हणाले.

नवाब मलिक म्हणतात, “बाबाजी, रुकिये ना!”

दरम्यान, रामदेव बाबांनी सामन्याला विरोध केल्यानंतर त्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया देणारं ट्वीट केलं आहे. “बाबाजी रुकिये ना” असं लिहीत त्यामध्ये त्यांनी मोदी है तो मुमकिन है असा हॅशटॅग देखील वापरला आहे.

बॉलिवुडनं आपला कचरा साफ करावा, नाहीतर…

दरम्यान, यावेळी बोलताना योग गुरू रामदेव बाबांनी आर्यन खान प्रकरणावर देखील प्रतिक्रिया दिली. “बॉलिवुडमध्ये जो ड्रग्जचा विनाशकारी प्रकार चाललाय, तो भारतातील युवा पिढीसाठी धोकादायक आहे. नशा करण्याला ग्लॅमराईज केलं जातंय. ज्यांना आदर्श मानलं जायचं, ते लोक देखील या प्रकारच्या कट-कारस्थानाच फसलेले दिसतात, तेव्हा लोकांना चुकीची प्रेरणा मिळते. सगळ्या इंडस्ट्रीनं मिळून आपला कचरा साफ करायला हवा. नाहीतर हे त्यांच्यासाठी देखील आत्मघाती ठरेल”, असं रामदेव बाबा म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 08:56 IST

संबंधित बातम्या