Pakistan Takes U Turn IND vs PAK T20 WC Match Play as Per Schedule: क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठे प्रतिस्पर्धी संघ असलेल्या भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारताविरूद्धच्या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला होता. पण आता ८ दिवसांतच पाकिस्तानचं डोकं आयसीसीने ठिकाण्यावर आलं असून पाकिस्तान सरकारने माघार घेतली आहे. यासह आता भारत-पाकिस्तान संघांमधील हायव्होल्टेज लढत येत्या रविवारी पाहायला मिळणार आहे.

पाकिस्तान सरकारने पाकिस्तान क्रिकेट संघाला भारताविरुद्ध सामना खेळण्याच्या सूचना दिल्या केल्या आहेत. सरकारने सोशल मीडिया पोस्टद्वारे याची घोषणा केली. यासह आता रविवार १५ फेब्रुवारी रोजी टी-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामना होणार आहे.

पाकिस्तान व बांगलादेश क्रिकेट बोर्ड तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यांच्यात सलग चर्चा सुरू होत्या. ICC चे प्रमुख जय शाह यांच्या सल्लामसलतीनंतर झालेल्या या बैठकीत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) भारताविरुद्ध सामना खेळण्याचे आवाहन केले. त्यानंतर पाकिस्तान सरकारने आपली भूमिका बदलली.

पाकिस्तानने सरकारने भारत-पाक सामन्याबद्दल काय पोस्ट केली?

पाकिस्तान सरकारने निवेदनात म्हटलं आहे की, “बहुपक्षीय चर्चांमधून सकारात्मक निष्कर्ष मिळाल्याने तसेच मैत्रीपूर्ण राष्ट्रांच्या विनंतीचा विचार करून, पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाला १५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकातील नियोजित सामन्यासाठी मैदानात उतरण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.”

या संपूर्ण नाट्यावर पडदा पडल्याचे स्पष्ट करत ICC नेही प्रतिक्रिया दिली. “ICC आणि PCB यांच्यातील संवाद व्यापक चर्चेचा भाग होता. दोन्ही पक्षांनी खेळाच्या सर्वोत्तम हितासाठी प्रामाणिकपणा, तटस्थता आणि सहकार्य राखत एकत्रित व सकारात्मक भूमिका घेतली,” असे ICC कडून सांगण्यात आले.

बीसीबीचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी यापूर्वी दिलेल्या निवेदनात, गेल्या आठवड्याच्या शेवटी पडद्यामागे झालेल्या चर्चांचा संकेत दिला होता.
“काल (रविवार) पाकिस्तानला दिलेल्या भेटीनंतर आणि चर्चेतून सकारात्मक निष्कर्ष अपेक्षित असल्याने, संपूर्ण क्रिकेट विश्वाच्या हितासाठी पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना खेळावा, अशी मी विनंती करतो,” असे माजी बांगलादेश कर्णधार अमिनुल इस्लाम यांनी म्हटलं होतं.

ICCने पाकिस्तानच्या कोणत्या मागण्या फेटाळल्या?

या घडामोडींशी परिचित असलेल्या सूत्रांच्या मते, आयसीसीचे प्रमुख जय शाह यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आणि पीसीबीकडून करण्यात आलेल्या अनेक मागण्या स्पष्टपणे फेटाळून लावल्या. “पीसीबी अधिक महसूल वाटा आणि भारतासोबत द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करण्याची अट घालत होते. मात्र आयसीसीने या कोणत्याही मागण्या मान्य करण्यास नकार दिला,” असे चर्चेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा

दरम्यान, ‘फोर्स मॅज्युअर’ कलम लागू करण्याची पाकिस्तानची मागणी आयसीसीने फेटाळल्यानंतर, भारताविरुद्ध सामना बहिष्कृत करण्याच्या भूमिकेवरून पाकिस्तान माघार घेण्याचे संकेत दिसू लागले. आयसीसीचं म्हणणं होतं की, परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर असल्याचा पाकिस्तानचा युक्तिवाद कमकुवत आहे. तसेच, जर पीसीबी आपल्या निर्णयावर ठाम राहिली, तर त्यांना मोठा दंड आणि कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागेल, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट विश्वात एकाकी पडेल, असा इशाराही देण्यात आला.

मात्र याआधी सोमवारी मोहसिन नक्वी यांनी या धमक्यांची पर्वा नसल्याचं म्हटलं होतं, “आम्ही अशा धमक्यांना घाबरणाऱ्यांपैकी नाही. आमचे फील्ड मार्शल (आसिम मुनीर) कोण आहेत, हे सगळ्यांना माहित आहे. कोणत्याही निर्बंधांची आम्हाला चिंता नाही,” असं नक्वी म्हणाले होते.

भारत-पाकिस्तान सामन्याच्या बहिष्कार वादाची सुरुवात बांगलादेशने भारतात टी-२० विश्वचषक सामने खेळण्यास नकार दिल्याने झाली. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सला वेगवान गोलंदाज मुस्ताफिजूर रहमानला रिलीज करण्यास सांगितल्यानंतर बांगलादेशने हा निर्णय घेतला होता.

बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडचा समावेश झाल्यानंतर, आयसीसीकडून “दुहेरी निकष” लावले जात असल्याचा आरोप करत पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धचा सामना बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या भूमिकेला पाठिंबा देण्याबाबत नक्वी म्हणाले, “बांगलादेशची भूमिका योग्य होती, त्यामुळे आम्हाला त्यांना पाठिंबा द्यावाच लागला.”

दरम्यान, बांगलादेशकडून आलेले नवे निवेदन आणि आयसीसीची बदललेली भूमिका एकाच वेळी समोर आली. बांगलादेशने भारतात प्रवास करण्यास नकार दिल्यानंतर आयसीसीने त्यांच्यावर निर्बंध लावण्याचे संकेत दिले होते. मात्र आता आयसीसीने स्पष्ट केलं आहे की, “बांगलादेश क्रिकेट बोर्डावर कोणतीही आर्थिक, क्रीडात्मक किंवा प्रशासकीय कारवाई केली जाणार नाही. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०३१पूर्वी बांगलादेशला एका आयसीसी स्पर्धेचे यजमानपद दिले जाईल, असा करार झाला आहे,” हेही आयसीसीने जाहीर केलं.