U-19 India vs Pakistan Asia Cup: १९ वर्षाखालील आशिया चषकात आज पाकिस्तानने टीम इंडियाचा आठ गडी राखून पराभव केला. अझान अवेसच्या झंझावाती शतकी खेळीपुढे सर्व भारतीय गोलंदाज निष्प्रभ ठरले. अंडर-१९ आशिया चषक २०२३च्या ‘अ’ गटात सर्वात मोठे प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडले, त्यात पाकिस्तानने भारताचा पराभव करत त्याच गटात अव्वल स्थान मिळवले आहे. भारतीय संघ अजूनही दुसऱ्या स्थानी आहे. भारताला आगामी सर्व सामने जिंकावे लागतील तरच ‘मेन इन ब्लू’ला उपांत्य फेरी खेळता येतील.

अंडर-१९ आशिया चषक २०२३ च्या ‘अ’ गटात पाकिस्तान क्रिकेट संघाने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ९ गडी गमावून २५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने आझम आवशच्या शतकाच्या जोरावर केवळ दोन गडी गमावून लक्ष्य गाठले. भारतीय संघाचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव आहे. अझान अवेसने नाबाद १०५ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याने भारताच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. त्याला कर्णधार साद बेगने ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. सलामीवीर शमाईल हुसेन ८ धावा करून बाद झाला तर शाजेब खान ६३ धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. अझान अवेसला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

तत्पूर्वी, पहिल्या डावात भारताकडून तीन फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. आदर्श सिंगने सर्वाधिक ६२ धावा केल्या. कर्णधार उदय सहारनने ६० आणि सचिन दासने ५८ धावांचे योगदान दिले. अर्शीन कुलकर्णी २४ धावा करून बाद झाला तर, रुद्र पटेल केवळ एक धाव काढून बाद झाला. पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून मोहम्मद जीशानने चार विकेट्स घेतल्या. आमिर हसन आणि उबेद शाह यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अराफत मिन्हासने एक विकेट घेतली.

हेही वाचा: WI vs ENG T20: ४० चेंडूत शतक अन् हॅट्ट्रिक घेणाऱ्या वेस्ट इंडिजच्या ‘या’अष्टपैलू खेळाडूचे दोन वर्षांनी संघात पुनरागमन

या सामन्याआधी भारताने अफगाणिस्ताचा पराभव केला होता. भारतीय गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत अफगाणिस्तानला अवघ्या १७३ धावांत गुंडाळले आणि भारतीय संघाने सात गडी राखून विजय मिळवला होता. अर्शीन कुलकर्णीने भारताकडून चमकदार कामगिरी करत ७० धावा केल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळचा पराभव केला होता. मोहम्मद झीशानने सहा विकेट्स घेत नेपाळला १५२ धावांत गुंडाळले होते. यानंतर अझान अवेस आणि साद बेग यांच्या अर्धशतकांमुळे संघाने २६.२ षटकांत सात विकेट्स शिल्लक असताना लक्ष्याचा पाठलाग केला. भारताचा पराभव करत पाकिस्तानने या आशिया चषकात दोन सामने जिंकले आहेत.

हेही वाचा: Hardik Pandya: BCCI सचिव जय शाहांनी दिले हार्दिक पंड्याच्या परतण्याचे संकेत; म्हणाले, “या मालिकेत तो…”

दोन्ही संघांची प्लेईंग -११

भारत अंडर-१९ संघ: आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, रुद्र पटेल, उदय सहारन (कर्णधार), मुशीर खान, सचिन धस, अरावेली अवनीश (यष्टीरक्षक), सौम्या पांडे, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी.

पाकिस्तान अंडर-१९: शमिल हुसेन, शाहजेब खान, अझान अवेस, साद बेग (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मोहम्मद जीशान, मोहम्मद रियाझुल्ला, तय्यब आरिफ, अराफत मिन्हास, अली असफंद, अमीर हसन, उबेद शाह.

Story img Loader