Wasim Akram has made a shocking revelation in his book about Sachin Tendulkar's controversial run out | Loksatta

IND vs PAK: सचिन तेंडुलकरच्या वादग्रस्त रनआऊटबाबत वसीम अक्रमचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘ब्रेकच्या वेळी…’

१९९८-९९ मध्ये ईडन गार्डनवर झालेल्या भारत-पाक सामन्यात सचिन तेंडुलकरला वादग्रस्त पद्धतीने धावबाद देण्यात आले होते. या सामन्याबद्दल वसीम अक्रमने आपल्या पुस्तकात मोठा खुलासा केला आहे.

IND vs PAK: सचिन तेंडुलकरच्या वादग्रस्त रनआऊटबाबत वसीम अक्रमचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, ‘ब्रेकच्या वेळी…’
वसीम अक्रमचा धक्कादायक खुलासा. (संग्रहित छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

क्रिकेटमध्ये भारत-पाकिस्तान हे जगातील सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात.जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेकांसमोर येतात, तेव्हा भारत आणि पाकिस्तानच नव्हे संपूर्ण जग या सामन्याचा आनंद घेताना दिसते. दोन्ही देशांत अनेक दिग्गज खेळाडूही झाले आहेत. सचिन तेंडुलकर आणि वसीम अक्रम हे अशा महान खेळाडूंपैकी एक आहेत. अशात आता अक्रमने आपल्या पुस्तकात तेंडुलकरच्या धावबादशी संबंधित एक धक्कादायक खुलासा केला आहे. या धावबादनंतर सुनील गावसकरने सचिनला पुन्हा मैदानात बोलावण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी नकार दिला होता.

खरेतर, १९९८-९९ दरम्यान आशियाई कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत कोलकाता येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना खेळला जात होता. पहिल्या डावात सचिन तेंडुलकरला शोएब अख्तरने जबरदस्त यॉर्कर चेंडूवर त्रिफळाचित केले होते. त्याचबरोबर दुसऱ्या डावात सचिन तेंडुलकरला वादग्रस्त पद्धतीने धावबाद करण्यात आले होते. यावर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने धक्कादायक खुलासा केला आहे.

वसीम अक्रमने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा –

दुसऱ्या डावात सचिन ज्या पद्धतीने धावबाद झाला होता, तो मोठा वादाचा विषय बनला होता. धाव घेताना सचिन तेंडुलकर शोएब अख्तरला धडकल्यामुळे धावबाद झाला. त्यामुळे ईडन गार्डनमधील चाहतेही चांगलेच संतापले. लोकांनी दगडफेक सुरू केल्याने सामना थांबवावा लागला होता. या सर्व घटनेचे वर्णन करताना वसीम अक्रमने आपल्या पुस्तकात खुलासा केला आहे.

हेही वाचा – IND vs BAN: भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का; शमी पाठोपाठ ऋषभ पंत वनडे मालिकेतून बाहेर

वसीम अक्रम म्हणाला, ”ब्रेकच्या वेळी सामनाधिकारींसोबत सुनील गावस्कर माझ्याकडे आले. तुम्ही सचिनला पुन्हा खेळायला बोलवा, असे ते म्हणाले. भारतात लोक तुमच्यावर खूप प्रेम करतील. सुनील गावसकर यांना कोलकात्यातील गर्दी किती उत्तेजित होते हे माहीत होते. मी म्हणालो की, माझेही चाहते आहेत आणि मला त्यांची काळजी करावी लागेल. हा माझा निर्णय नाही. अंपायरने सचिनला बाद दिले आणि निर्णय बदलायला उशीर झाला. हा एक अपघात होता हे आपल्या सर्वांना माहीत आहे, पण क्रिकेटमध्ये अशा घटना घडतात.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 14:21 IST
Next Story
Virendra Sehwag: स्कोअर कार्ड विसरा, सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ओळखा; वीरेंद्र सेहवागचं आवाहन