वृत्तसंस्था, दुबई : महिला आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत तुलनेने दुबळ्या प्रतिस्पध्र्यांवर वर्चस्व गाजवत उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित केलेल्या भारतीय संघाची आज, शनिवारी पाकिस्तानशी गाठ पडणार आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धांतील या द्वंद्वाची उत्सुकता कायम असली, तरी इतिहास आणि दोन्ही संघांची लय पाहता भारताचे पारडे जड मानले जात आहे.

बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यांना नेहमीच मोठे महत्त्व मिळते. मात्र, अलीकडच्या काळात प्रत्यक्ष मैदानावरील लढती पूर्णपणे एकतर्फी झाल्याचे आणि त्यात भारतीय संघच सरस ठरत असल्याचे चित्र आहे. भारत आणि पाकिस्तानचे महिला संघ ट्वेन्टी-२० प्रारूपात आतापर्यंत १७ वेळा आमनेसामने आले असून यात भारताने १४ लढतींत बाजी मारली आहे. आता हाच दबदबा कायम राखण्यासाठी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ प्रयत्नशील असेल.

उपांत्य फेरी गाठल्यानंतरही भारतासाठी हा सामना केवळ औपचारिक राहणार नाही. आगामी महत्त्वाच्या स्पर्धा आणि विश्वचषक लक्षात घेता संघाला आपल्या काही उणीवा दूर करण्याची गरज आहे. विशेषत: मधल्या फळीतील फलंदाजांची कामगिरी भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. दुबई येथे सुरू असलेल्या आशिया चषकातील सलामीच्या लढतीत थायलंडवरील विजयात शफाली वर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली. दुसर्या लढतीत भारताने हाँगकाँगचा धुव्वा उडवला, त्यात स्मृती मनधानाने उत्कृष्ट शतक साकारले. मात्र, स्मृती आणि शफाली या सलामीच्या फलंदाज वगळता भारताची एकही फलंदाज प्रभाव पाडू शकलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध संधी मिळाल्यास, त्यांनी कामगिरी उंचावणे गरजेचे आहे.

पाकिस्तानला विजय मिळवायचा असल्यास, सर्व प्रथम फलंदाजीतील उणीवा दूर कराव्या लागतील. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या संघाला फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका बसत आहे. थायलंडविरुद्धच्या गेल्या सामन्यातही पाकिस्तानची अवस्था बिकट झाली होती. सुरुवातीलाच तीन फलंदाज बाद झाल्याने संघावर मोठे दडपण आले. अखेरीस पाकिस्तानने केवळ ११९ धावांचे आव्हान उभे केले, पण तुलनेने दुबळ्या थायलंडविरुद्ध त्यांना या धावा पुरेशा ठरल्या. आता भारताविरुद्ध त्यांच्या फलंदाजांना अधिक मोठे योगदान द्यावे लागेल. पाकिस्तानचा संघ सलामीची फलंदाज मुनीबा अली आणि कर्णधार फातिमा सना यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून असेल.
’ वेळ : रात्री ८ वा.
’ थेट प्रक्षेपण : सोनी टेन १, ३, सोनी लिव्ह ॲप.