KL Rahul Statement on India Playing 11: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्यापासून म्हणजेच ३० ऑक्टोबरपासून वनडे मालिका खेळवली जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जडेजा हे दिग्गज खेळाडू मालिकेत खेळताना दिसणार आहेत. शुबमन गिलच्या अनुपस्थितीत संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी केएल राहुलच्या खांद्यावर असणार आहे. गिल व श्रेयस अय्यर दोघेही नसल्याने राहुल संघाचे नेतृत्त्व करेल. यादरम्यान पहिल्या सामन्यापूर्वी राहुलने प्लेईंग इलेव्हनबाबत माहिती दिली आहे.

कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारताचा वनडे संघ या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्मा, विराट, जडेजासह या मालिकेसाठी फॉर्मात असलेल्या ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली आहे. तर बऱ्याच काळानंतर ऋषभ पंत वनडे सामने खेळताना दिसणार आहे. यासह आता सामन्यात विकेटकिपर कोण असणार व ऋतुराजला मालिकेत संधी मिळणार की नाही, याबाबत राहुलने अपडेट दिले आहेत.

IND vs SA 1st ODI प्लेईंग इलेव्हनबाबत केएल राहुल काय म्हणाला?

सामन्याच्या एक दिवस आधी, शनिवार, २९ नोव्हेंबरला, कर्णधार केएल राहुल पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यादरम्यान राहुलने प्लेइंग इलेव्हनमध्ये आपल्या फलंदाजीच्या स्थानाची घोषणाही केली. भारतीय कर्णधाराने स्पष्ट केलं की तो संपूर्ण मालिकेत मधल्या फळीत फलंदाजी करेल. तो म्हणाला, “मी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेन, याच क्रमांकावर मी फलंदाजी करत आलो आहे.”

ऋषभ पंत आणि ऋतुराज गायकवाड यांच्याबाबतही प्रश्न विचारण्यात आले. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पंत संघात परतला आहे, त्यामुळे त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळणार का?, याबाबत राहुल म्हणाला, “ऋषभ पंत संघासाठी किती महत्त्वाची कामगिरी करतो, हे आपण पाहत आलो आहोत. ऋषभ स्पेशालिस्ट फलंदाज म्हणूनही खेळू शकतो, उद्या नक्की काय ते चित्र समजेल. जर ऋषभ पंत खेळणार असेल तर साहजिकच तो विकेटकिपिंग करेल, पण याबाबत निश्चित निर्णय उद्या कळेल.”

ऋषभ पंतनंतर ऋतुराज गायकवाड जवळजवळ दोन वर्षांनी या फॉरमॅटमध्ये परतला आहे. ऋतुराज गायकवाड रोहित शर्मासह सलामीला उतरणार का, या मालिकेत त्याला खेळण्याची संधी मिळणार का… यासंबंधित प्रश्नांवर राहुल म्हणाला, “ऋतुराज गायकवाड हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. एकदिवसीय संघातील टॉप ५-६ खेळाडू निश्चित आहेत. पण त्याला मिळालेल्या मर्यादित संधींमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. या मालिकेत त्याला संधी देण्यासाठी मी उत्सुक आहे.”

शुबमन गिलच्या अनुपस्थितीत आता रोहित शर्माबरोबर सलामीला ऋतुराज गायकवाड उतरणार की यशस्वी जैस्वाल हे सामन्यापूर्वीच नाणेफेकीदरम्यान नक्की कळेल.