India (IND) vs South Africa (SA) 1st Test Highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. पहिला कसोटी सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे. ६ वर्षांनंतर पहिल्यांदाच ईडन गार्डन्स मैदानावर कसोटी सामना होत आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवण्यात आला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला १५६ धावांवर सर्वबाद केल्यानंतर फलंदाजी करताना २० षटकांत १ बाद ३७ धावा केल्या आहेत. यासह भारतीय संघ १२२ धावांनी पिछाडीवर आहे. यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर केएल राहुल व वॉशिंग्टन सुंदरने संघाचा डाव सावरला. खराब सूर्यप्रकाशामुळे पंचांनी काही वेळ सामना सुरू ठेवला, पण हिवाळा असल्याने लवकर अंधार पडतो. त्याचप्रमाणे अंधार पडू लागल्याने खेळ लवकर बंद करण्यात आला.

भारताला पहिला धक्का

मार्को यान्सनने सातव्या षटकात यशस्ली जैस्वालला क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. जैस्वाल १२ धावा करत बाद झाला.

दक्षिण आफ्रिका सर्वबाद

जसप्रीत बुमराहने ५५व्या षटकात दोन विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद केलं. यासह जसप्रीत बुमराहने कसोटीच्या पहिल्याच दिवशी ५ विकेट्स घेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बुमराहने फक्त २७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या आहेत. यासह दक्षिण आफ्रिकेचा संघ १५९ धावांवर सर्वबाद झाला.

दक्षिण आफ्रिकेला ८ वा धक्का!

दक्षिण आफ्रिकेला ८ वा धक्का बसला आहे. कॉर्बिन वॉश अवघ्या ३ धावा करत माघारी परतला आहे. त्याला अक्षर पटेलने त्रिफळाचित केलं आहे.

मोहम्मद सिराजचे एका षटकात दोन विकेट्स

मोहम्मद सिराजने ४५व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर काईल वेरेनला पायचीत करत बाद केलं. यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने मार्को यान्सनला क्लीन बोल्ड करत अजून एक विकेट मिळवली.

टॉनी डी झॉर्झी पायचीत

जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर झॉर्झी चारी मुंड्या चित झाला. बुमराहचा भेदक चेंडू थेट त्याच्या डाव्या पायाच्या पॅडवर जाऊन आदळला आणि पायचीत होत माघारी परतला. यासह दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी परतला.

कुलदीपच्या खात्यात दुसरी विकेट

कुलदीप यादवने दुसऱ्या सत्रात झोर्झी व वियान मुल्डरची भागीदारी तोडली आणि संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. कुलदीपच्या गोलंदाजीवर मुल्डर स्वीप मारायला चुकला अन् पायचीत होत माघारी परतला.



दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू

या सामन्यातील पहिल्या सत्रात दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरूवात मिळाली होती. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ३ प्रमुख फलंदाजांना बाद करून भारतीय संघाला दमदार पुनरागमन करून दिलं.

लंचब्रेक

दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या सत्रात ३ बाद १०५ धावा केल्या आहेत. टॉनी दी झॉर्झी व वियान मुल्डर यांनी चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सावरला आहे. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने दोन व कुलदीप यादवने एक विकेट घेतली आहे.

भारताच्या खात्यात तिसरी विकेट

कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या मदतीने तेंबा बावुमाला झेलबाद करवत संघाला तिसरी मोठी विकेट मिळवून दिली. यादरम्यान बॅकवर्ड शॉर्ट लेगला तैनात असलेल्या ध्रुव जुरेलने एक कमालीचा झेल टिपला.

पुढच्या षटकात मारक्रम परतला माघारी

जसप्रीत बुमराहने स्पेलमधील पुढच्या षटकात एडन मारक्रमला माघारी धाडत दोन्ही सेट झालेल्या फलंदाजांची विकेट संघाला मिळवून दिली. बुमराहला एक्स्ट्रा बाऊन्स मिळाल्याने मारक्रमने बॅकफूटवर जात बॅट लावली आणि पंतने हवेत झेप घेत कमालीचा झेल टिपला.

जसप्रीत बुमराहने भारताला मिळवून दिला ब्रेकथ्रू

जसप्रीत बुमराहने ११व्या षटकात रिकल्टनला क्लीन बोल्ड करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. रिकल्टन व मारक्रम यांच्यात चांगली भागीदारी रचली जात होती आणि बुमराहने तितक्यात कमालीच्या चेंडूवर त्याला बाद केलं. यासह दक्षिण आफ्रिकेने ११ षटकांत १ बाद ५७ धावा केल्या आहेत.

सामन्याला सुरूवात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. ५ षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने १८ धावा केल्या आहेत. यासह एडन मारक्रमने २० चेंडू खेळत अजूनही खातं उघडलेलं नाहीत. तर रिकल्टन १४ धावा करत खेळत आहे.

भारताची प्लेईंग इलेव्हन
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिकेची प्लेईंग इलेव्हन

एडन मारक्रम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, तेंबा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (यष्टीरक्षक), सायमन हार्मर, मार्को यान्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज

नाणेफेक

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याची नाणेफक द. आफ्रिकेने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर टीम इंडिया गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. भारतीय संघ सहा गोलंदाजांसह कसोटी सामन्यात खेळताना दिसणार आहे, ज्यामध्ये चार फिरकीपटू खेळणार आहेत. तर साई सुदर्शनला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी न देता वॉशिंग्टन सुंदर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या कसोटीत कागिसो रबाडा व सेनेरन मुथ्थुसामी हे दोन गोलंदाज खेळताना दिसणार नाहीत.

ईडन गार्डन्स मैदानावर भारत-आफ्रिका १५ वर्षांनी कसोटीत आमनेसामने

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ १५ वर्षांनी ईडन गार्डन्सवर कसोटी सामना खेळणार आहेत. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना १९९६ मध्ये याच मैदानावर खेळवण्यात आला होता. तेव्हापासून २०१० पर्यंत, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ईडन गार्डन्सवर तीन कसोटी सामने झाले होते, ज्यामध्ये भारत २-१ ने आघाडीवर होता. २००० पासून दक्षिण आफ्रिकेने भारतात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही.

भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटीमधील रेकॉर्ड

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील हा ४५ वा कसोटी सामना आहे. याआधी खेळल्या गेलेल्या ४४ कसोटींपैकी भारताने १६ जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने १८ सामने जिंकले आहेत. दहा कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.

भारताच्या घरच्या मैदानावर या दोन्ही संघांमधील हा २०वा कसोटी सामना असेल. यापूर्वी खेळल्या गेलेल्या १९ कसोटींपैकी भारताने ११ कसोटी जिंकल्या आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने पाच कसोटी सामने आपल्या नावे केले आहेत, त्यापैकी तीन कसोटी अनिर्णित राहिल्या.