Jasprit Bumrah Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातही भारतीय संघाने नाणेफेक गमावली आहे. त्यामुळे भारतीय संघाला नाणेफेक गमावून प्रथम गोलंदाजीसाठी यावं लागलं. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार सुरूवात केली. सुरूवातीच्या १० षटकात दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेचा संघ मजबूत स्थितीत होता, पण भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहने ही जोडी फोडून काढली. यादरम्यान त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून रायन रिकल्टन आणि एडेन मारक्रम ही जोडी मैदानावर आली होती. बुमराहने आधी रिकल्टनला त्रिफळाचित केलं. त्यानंतर वेगवान उसळी घेणारा चेंडू टाकून त्याने मारक्रमलाही बाद केलं. रिकल्टन अवघ्या २३ धावा करत माघारी परतला. तर मारक्रम ३१ धावांवर माघारी परतला. त्यामुळे ५७ धावांवर दक्षिण आफ्रिकेला पहिला मोठा धक्का बसला.

रिकल्टन बाद होताच जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याला बाद करण्यापूर्वी बुमराहने १५१ फलंदाजांना त्रिफळाचित केलं होतं. दरम्यान रिकल्टन हा बुमराहच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित होणारा १५२ वा फलंदाज ठरला आहे. यासह त्याने माजी गोलंदाज आर अश्विनला मागे टाकलं आहे. अश्विनने १५१ फलंदाजांना त्रिफळाचित केलं होतं. आता बुमराह अश्विनला मागे टाकून पुढे निघाला आहे. या यादीत भारताचे माजी गोलंदाज अनिल कुंबळे अव्वल स्थानी आहेत. अनिल कुंबळे यांनी १८६ फलंदाजांना त्रिफळाचित करत माघारी धाडलं आहे. तर माजी कर्णधार कपिल देव या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांनी १६४ फलंदाजांना त्रिफळाचित करत माघारी धाडलं होतं.

दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेसाठी सुरूवातीला फायदेशीर ठरला. पण रिकल्टन आणि मारक्रमची जोडी स्वस्तात माघारी परतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला. भारतीय गोलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट्सची रांग लावली. टी ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेचे ७ फलंदाज तंबूत परतले आहेत. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३, तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले आहेत.