India vs South Africa 1st Test: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये वनडे, टी-२० आणि कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर सुरू आहे. या सामन्यातही भारतीय संघाला नाणेफेक जिंकता आलेलं नाही. पाहूण्या दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरूवात मिळाली होती. पण त्यानंतर जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेला लागोपाठ २ धक्के दिले आणि भारतीय संघाला पुनरागमन करून दिलं.

भारतीय संघाने गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठे विजय मिळवले आहेत. पण नाणेफेक जिंकण्यात भारतीय संघाला संघर्ष करावा लागत आहे. इंग्लंड दौऱ्यावर असताना पाचही सामन्यांमध्ये भारतीय संघाने नाणेफेक गमावलं होतं. या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. या सामन्यातहीक नाणेफेक गमावून भारतीय संघाला प्रथम गोलंदाजीसाठी यावं लागलं.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दमदार सुरूवात केली. सुरूवातीच्या १० षटकात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी बिनबाद ५७ धावा जोडल्या. त्यामुळे भारतीय संघावरील दबाव वाढत चालला होता. एडेन मारक्रम आणि रायन रिकल्टनची जोडी वेगाने धावा जोडत होती. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर ही जोडी फोडून काढण्याचं सर्वात मोठं आव्हान होतं. पण बुमराहने ही जोडी फोडली.

तर झाले असे की, भारतीय संघाकडून ११ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. त्यावेळीस डावखुऱ्या हाताचा फलंदाज रायन रिकल्टन स्ट्राईकवर होता. या षटकातील तिसरा चेंडू बुमराहने ताशी १४०.७ किमीच्या गतीने टाकला.

गुड लेंथवर टाकलेला हा चेंडू टप्पा पडताच फिरला आणि ऑफ स्टंप उडवून गेला. रायन रिक्लटनला नेमकं काय झालं, हे सुद्धा कळालं नाही. त्यामुळे रायन रिकल्टनचा डाव २३ धावांवर आटोपला. त्यानंतर १२ व्या षटकात बुमराहने मारक्रमला ३१ धावांवर बाद करत माघारी धाडलं.