Jasprit Bumrah Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना ईडन गार्डन्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिला दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. पहिल्या विकेटसाठी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ५७ धावांची दमदार सुरूवात केली. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ गडी बाद केले. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १५९ धावांवर आटोपला. पहिल्या डावात ५ गडी बाद करणाऱ्या बुमराहच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामी जोडीने हा निर्णय सार्थ ठरवून पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर बुमराहने दक्षिण आफ्रिकेला लागोपाठ २ धक्के दिले. आधी रिकल्टन आणि त्यानंतर मारक्रम दोघांनी एका पाठोपाठ एक पॅव्हेलियनची वाट धरली. या दमदार गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

या डावात ५ गडी बाद करताच बुमराहच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये १६ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. यासह त्याने भारताचे माजी गोलंदाज भागवत चंद्रशेखर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. भारतीय संघासाठी खेळताना आर अश्विनने ३७ वेळेस, अनिल कुंबेळेंनी ३५ वेळेस, हरभजन सिंगने २५ वेळेस, कपिल देव यांनी २३ वेळेस ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे.

यासह बुमराहच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. २०१९ मध्ये बांगलादेशविरूद्ध झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना ईशांत शर्माने गोलंदाजी करताना पहिल्याच दिवशी ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. त्याआधी कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना डेल स्टेनने २००८ मध्ये खेळताना हा विक्रम आपल्या नावे केला होता. दरम्यान ६ वर्षांनंतर भारतात गोलंदाजी करताना, पहिल्याच दिवशी ५ गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी पोहोचला आहे.