Ravindra Jadeja Breaks Kapil Dev Record: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा २ कारणांमुळे चर्चेत आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या यशात रवींद्र जडेजाचा मोलाचा वाटा राहिला आहे. आगामी हंगामापूर्वी त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाची साथ सोडून राजस्थान रॉयल्स संघात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हे आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातीस सर्वात मोठ्या ट्रेडपैकी एक आहे. तर दुसरीकडे त्याने कोलकाताच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

रवींद्र जडेजाच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ३०० हून अधिक गडी बाद करण्याची नोंद आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने कसोट क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये ३०० हून अधिक गडी बाद करणारा आणि ४००० हून अधिक धावा करणारा जगातील चौथा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. या विक्रमाच्या यादीत कपिल देव, इयान बॉथम आणि डॅनिअल विटोरीसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये ४००० हून अधिक धावा आणि ३०० हून अधिक गडी बाद करणारे गोलंदाज

इयान बॉथम- (५२०० धावा, ३८३ विकेट)
कपिल देव- (५२४८ धावा, ४३४ विकेट)
डॅनिअय विटोरी- ( ४५३१ धावा, ३६२ विकेट)
रवींद्र जडेजा- (४००० धावा, ३३८ विकेट)

जडेजाने मोडला कपिल देव यांचा विक्रम

या सामन्यात ४००० धावांचा पल्ला गाठताच जडेजाच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो सर्वात जलद ४००० धावांचा पल्ला गाठणारा आणि ३०० हून अधिक गडी बाद करणारा भारतीय अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. तर जगातील दुसरा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम त्याने आपल्या ८७ व्या सामन्यात करून दाखवला आहे. तर अव्वल स्थानी असलेल्या इयान बॉथम यांनी हा पराक्रम आपल्या कारकिर्दीतील ७२ व्या सामन्यात करून दाखवला होता.

भारतीय संघाकडे पहिल्या डावात आघाडी

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १५९ धावांवर आटोपला. भारतीय संघाने आतापर्यंत ६ गडी बाद १७१ धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा २७ धावा करत माघारी परतला.