India vs South Africa 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने १७ धावांनी विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसरा सामना रायपूरच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला चांगली सुरूवात मिळाली होती. सुरूवातीच्या ४ षटकात भारतीय सलामी जोडीने २८ धावा जोडल्या होत्या. मात्र, ५ व्या षटकात भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला. रोहित शर्मा १४ धावा करत माघारी परतला. या खेळीदरम्यान त्याने ३ खणखणीत चौकार मारले. यादरम्यान त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानावर आली. यशस्वीने एका बाजूने दमदार सुरूवात केली. तर रोहितला सुरूवातीच्या ४ षटकात अवघे ३ चेंडू खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर पाचव्या षटकात त्याने लागोपाठ ३ चौकार मारले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९००० धावांचा पल्ला गाठला आहे. रोहित घरच्या मैदानावर फलंदाजी करताना ९००० धावा करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविडला हा पराक्रम करता आला आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून पाचवे षटक टाकण्यासाठी नांद्रे बर्गर गोलंदाजीला आला. या षटकात रोहितने ३ लागोपाठ चौकार खेचले. या चौकांरासह भारतात सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात त्याने राहुल द्रविडला मागे टाकलं आहे. आता मायदेशात फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
हे आहेत मायदेशात फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
सचिन तेंडुलकर- १४१९२ धावा
विराट कोहली- १२३७३ धावा
रोहित शर्मा -९००५ धावा*
राहुल द्रविड- ९००४ धावा
