India vs South Africa 2nd ODI: रायपूरच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३६० धावांचे आव्हान ठेवले आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनीही दमदार सुरूवात केली. यादरम्यान धावांचा बचाव करताना तिलक वर्माने सीमारेषेवर अविश्वसनीय क्षेत्ररक्षण केलं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी ३६० धावांचा डोंगर सर करायचा आहे. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज क्विंटन डीकॉक स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर कर्णधार तेंबा बावूमा आणि एडेन मारक्रम या जोडीने मिळून दक्षिण आफ्रिकेचा डावा सांभाळला. यादरम्यान एडेन मारक्रमने डीप मिडविकेटच्या वरून षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण सीमारेषेवर असलेल्या तिलक वर्माने डाईव्ह मारून हा षटकार अडवला.
तर झाले असे की,धावांचा पाठलाग करत असताना एडेन मारक्रम आणि तेंबा बावूमाची जोडी चांगलीच जमली होती. त्यावेळी भारतीय संघाकडून २० वे षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव गोलंदाजीला आला. कुलदीपने टाकलेल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मारक्रमने डीप मिडविकेटच्या वरून खणखणीत शॉट मारला.हा चेंडू वेगाने सीमारेषेच्या पार जात होता. पण नेमकं त्याचवेळी सब्स्टीट्यूट खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या तिलक वर्माने डाईव्ह मारली आणि हवेत उडून झेल घेतला. पण त्याचा तोल गेल्याने त्याने चेंडू मैदानाच्या आत फेकला. त्यामुळे त्याने संघासाठी ५ धावा वाचवल्या.
भारतीय संघाने उभारला ३५९ धावांचा डोंगर
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करण्यसाठी आलेल्या भारतीय संघाकडून ऋतुराज गायकवाडने दमदा १०५ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने लागोपाठ शतक झळकावलं. या सामन्यात त्याने १०२ धावांची खेळी केली. सलामीला आलेल्या रोहितने १४ आणि यशस्वीने २२ धावांची खेळी केली. शेवटी केएल राहुलने नाबाद ६६ आणि रवींद्र जडेजाने नाबाद २४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ५० षटकांअखेर ५ गडी बाद ३५८ धावा केल्या.
