Virat Kohli Century: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना रायपूरमध्ये सुरू आहे. या सामन्यातही विराट कोहलीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना विराटने १३५ धावांची दमदार खेळी केली होती. दरम्यान दुसऱ्या सामन्यातही त्याने दमदार शतकी खेळी केली आहे. हे त्याचं या मालिकेतील लागोपाठ दुसरं शतक ठरलं आहे. तर वनडे कारकिर्दीतील ५३ वे शतक ठरले आहे.
विराट कोहलीने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तो सध्या वनडे क्रिकेट खेळत आहे. मात्र, त्याच्या फलंदाजीतील धार काही कमी झालेली नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने १३५ धावांची खेळी केली होती. या सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद होऊन माघारी परतल्यानंतर त्याने ऋतुराज गायकवाडसोबत मिळून डाव सांभाळला आणि भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. दरम्यान त्याने ९० चेंडूंचा सामना करत या मालिकेतील लागोपाठ दुसरं शतक झळकावलं.
ऋतुराजसोबत मिळून केली विक्रमी भागीदारी
या सामन्यातही भारतीय संघाला नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी यावं लागलं. भारतीय संघाला चांगली सुरूवात मिळाली होती. पण लागोपाठ ३ चौकार मारल्यानंतर रोहित शर्मा बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जैस्वालने मिळून भारताचा डाव सांभाळला. पण जैस्वाल नको तो फटका मारून माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघाला सुरूवातीलाच दुसरा मोठा धक्का बसला. त्यामुळे विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडवर मोठी जबाबदारी होती. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी मिळून १९५ धावांची भागीदारी केली.
ऋतुराज गायकवाडचं शतक
विराट कोहलीने शतक झळकावण्याआधी ऋतुराज गायकवाडने दमदार शतकी खेळी केली. ऋतुराजला बऱ्याच महिन्यांनी भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात तो स्वस्तात माघारी परतला होता. त्यामुळे या सामन्यात त्याच्यावर दबाव होता. या दबावाखाली फलंदाजी करताना त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. दरम्यान त्याने ७७ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं.
