भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पुण्यातील गहुंजे मैदानावर सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने डावाने विजय मिळवण्याकडे आगेकूच केली आहे. पहिल्या डावात ६०१ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर, भारताने आफ्रिकेला २७५ धावांवर बाद करत त्रिशतकी आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस आफ्रिकेचा डाव संपुष्टात आल्यानंतर पंचांनी दिवसाचा खेळ थांबवला.

चौथ्या दिवशी कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेरीस विराट कोहलीने आफ्रिकेला फॉलोऑन देत पुन्हा एकदा फलंदाजीला निमंत्रीत केलं. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघावर लाजिरवाणा प्रसंग ओढावला आहे. गेल्या १० वर्षांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेवर कोणत्याही संघाने फॉलोऑन लादला नव्हता. ती कामगिरी आज भारतीय संघाने करुन दाखवली आहे. २००८ साली लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने आफ्रिकेवर फॉलोऑन लादला आहे.

दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. एडन मार्क्रम भोपळाही न फोडता इशांत शर्माच्या गोलंदाजीवर माघारी परतला.