India vs South Africa 2nd Test Match: जगभरात सर्व ठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी भारतीय संघ केपटाऊनला पोहोचला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना ३ जानेवारीपासून येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघ केपटाऊनला पोहोचल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज दक्षिण आफ्रिकेच्या राजधानीत पोहोचताच सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. त्याने कॅमेऱ्याकडे बघून “हॅपी न्यू इयर” म्हटले. सेंच्युरियनमधील सामना हरल्यानंतर रोहित शर्मा अँड कंपनीला नव्या वर्षाची सुरुवात दमदार विजयाने करायची आहे.
सेंच्युरियनमधील दारूण पराभवानंतर भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. मात्र, केपटाऊनमध्ये होणारी दुसरी कसोटी जिंकून टीम इंडियाला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. भारताने १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिकेबरोबर कसोटी मालिका खेळण्यास सुरुवात केली. या ३१ वर्षांत भारतीय संघ न्यूलँड्स स्टेडियमवर सहा कसोटी सामने खेळला आहे, पण एकही सामना जिंकू शकलेला नाही.
टीम इंडियाला केपटाऊनमध्ये चार पराभवांचा सामना करावा लागला असून दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. अशा स्थितीत या मैदानावर ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात त्यांना शानदार कामगिरीची गरज आहे. विशेषत: कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीला दमदार सुरुवात करावी लागेल. गेल्या १२ वर्षात या मैदानावर खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय सलामी जोडीने एकही शतकी भागीदारी केलेली नाही.
रोहित आणि यशस्वी यांच्यावर मोठी जबाबदारी
३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात रोहित आणि यशस्वी यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. शनिवारी नेटमध्ये सराव करताना मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर रोहितने चांगले शॉटस् मारले. त्याने ४५ मिनिटांपेक्षा जास्त काळ मुकेशच्या गोलंदाजीवर सराव केला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५च्या दृष्टीने आगामी काळातील सर्व कसोटी सामने जिंकणे टीम इंडियासाठी खूप गरजेचे आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघांचे संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, के.एस. भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन.
दक्षिण आफ्रिका: टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, जेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, डीन एल्गर. मार्को जॉन्सन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (यष्टीरक्षक).