विशाखापट्टणम कसोटीत बाजी मारल्यानंतर भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली धडाकेबाज कामगिरी करत पुण्याच्या कसोटीतही बाजी मारली आहे. आफ्रिकेवर १ डाव आणि १३७ धावांनी मात करत भारताने मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. कर्णधार या नात्याने विराट कोहलीसाचा हा ५० वा सामना होता. याच सामन्यात विराटने पहिल्या डावात नाबाद द्विशतकी खेळी करताना २५४ धावा केल्या. या कामगिरीसाठी विराटला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं.

यादरम्यान विराट कोहलीने कपिल देव आणि विरेंद्र सेहवाग या दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सामनावीराचा किताब पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट चौथ्या स्थानावर पोहचला आहे. विराटचा हा ९ वा सामनावीराचा पुरस्कार ठरला आहे.

घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग ११ वा मालिका विजय ठरला आहे. याआधी कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाहीये. या मालिका विजयामुळे भारताचं आयसीसी कसोटी क्रमवारीतलं पहिलं स्थान अधिक भक्कम होणार आहे. या मालिकेतला अखेरचा सामना १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : ऐतिहासिक कसोटीत विराटचा ‘Super 30’ क्लबमध्ये समावेश