India vs South Africa 3rd T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा टी २० सामना आज (१४ जून) विशाखापट्टणम येथील एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी सात वाजता खेळवला जाणार आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत २-० अशी आघाडी घेतलेली आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा मानस घेऊन पाहुणे मैदानात उतरतील. तर, आजचा सामना जिंकून मालिकेत आपले आव्हान टिकवण्यासाठी यजमान प्रयत्न करतील.
सामन्याच्या दिवशी विशाखापट्टणममधील तापमान ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. खेळादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. सामन्यादरम्यान ताशी १३ किलो मीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. डॉ. वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजीसाठी अनुकूल आहे. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू दोघांनाही ती उपयुक्त ठरेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईपुढे उत्तर प्रदेशचे आव्हान!
या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारण्यासाठी फलंदाजांना मधल्या काही षटकांमध्ये प्रयत्न करावा लागेल. या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी १०४ धावांचा इतिहास आहे. दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने या मैदानावरील ८० टक्के सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याला प्राधान्य देईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर आजच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. शिवाय, डिस्ने प्लस हॉटस्टारवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध असेल.
संभाव्य भारतीय संघ : ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान किंवा अर्शदीप सिंग.
संभाव्य दक्षिण आफ्रिका संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, ड्वेन प्रिटोरियस, रॉस व्हॅन डेर डुसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, वेन पार्नेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिक नॉर्किया, तबरेझ शम्सी.