भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीने उत्कृष्ट शतकी खेळी केली. विराटने शतक झळकावल्यानंतर मैदानावर एकच जल्लोषाचं वातावरण होतं. तर ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या खेळाडूंनीही उभं राहून टाळ्या वाजवत त्याचं कौतुक केलं. यादरम्यान विराटच्या शतकाचं सेलिब्रेशन करताना रोहित आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये भन्नाट काहीतरी बोलत कौतुक केलं होतं, त्याच्या बाजूला असलेल्या अर्शदीप सिंगने रोहित नेमकं काय बोलला होता, याचा व्हीडिओ शेअर केला आहे.
रोहित शर्मा त्याच्या विनोदी बोलण्याच्या शैलीमुळे अनेकदा चर्चेत असतो. कर्णधार असताना, स्टंप माइकवरून त्याचे अनेक मजेदार ऑडिओ रेकॉर्डिंग अनेकदा व्हायरल झालेले आपण पाहिले आहेत. याचप्रमाणे रोहितचा ड्रेसिंग रूममधील व्हीडिओ पहिल्या वनडे सामन्यादरम्यान व्हायरल झाला होता. रोहित शर्माने विराटच्या शतकानंतर दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत होती.
पहिल्या वनडेमध्ये जेव्हा विराट कोहलीने शतक पूर्ण केलें,तेव्हा रोहित शर्माने ड्रेसिंग रूममध्ये हसून टाळ्या वाजवल्या. यादरम्यान तो असं काहीतरी बोलला की त्याच्या शेजारी उभा असलेला अर्शदीप सिंग हसू लागला. रोहितचा व्हीडिओ पाहून अनेक चाहत्यांनी अंदाज लावला आहे की त्याने नेहमीच्या अंदाजात शिवी घातली आहे. पण तरीही अनेकांनी अर्शदीपला विचारलं की रोहित नेमकं काय म्हणाला, यावर अर्शदीपने एक व्हीडिओ शेअऱ केला आहे.
पंजाब किंग्ज आणि त्याच्या स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील अर्शदीप सिंगचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात अर्शदीप म्हणाला, कालपासून (रविवार, सामन्याच्या दिवशी) अनेक लोक त्याला मेसेज आणि फोन करत आहेत, विराट कोहलीच्या शतकानंतर रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला होता ते विचारतायत, यावर एका व्हायरल रीलमधील वाक्य अर्शदीप म्हणत सांगतो, रोहित भाई म्हणाला, ‘नीली परी लाल परी कमरे में बंद, मुझे नादिया पसंद’…।” हे म्हणताच अर्शदीप हसायला लागतो.
अर्शदीप सिंगलाही माहित आहे की रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला होता, रोहितची मस्करी व त्याचा अंदाज संघातील सर्व खेळाडूंना माहित आहे. अर्शदीपने एका व्हायरल मीममधील वाक्याचा उल्लेख करत या चर्चांना विनोदी वळण दिलं. अर्शदीपच्या या व्हीडिओवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला. रांची एकदिवसीय सामन्यात अर्शदीप सिंगनेही दोन विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
