भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो. वृत्तसंस्था एएनआयने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या संघात समाविष्ट असलेल्या भारताच्या सर्व खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारखे महत्त्वाचे खेळाडू संघाचा भाग नसतील. या स्थितीत शिखर धवनला कर्णधारपद मिळण्याची खात्री आहे. याशिवाय या मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मणला भारताचे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. गरज असताना लक्ष्मण याआधीच भारतीय संघाचा प्रशिक्षक बनला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ६ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. टी२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारताचे महत्त्वाचे खेळाडू या मालिकेतून बाहेर राहू शकतात. एवढेच नाही तर पुन्हा एकदा शिखर धवनला एकदिवसीय संघाची कमान मिळू शकते. एकदिवसीय सामन्यांपूर्वी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेसोबत तीन टी२० सामनेही खेळायचे आहेत. २८ सप्टेंबरपासून टी२० मालिकेला सुरुवात होणार असून शेवटचा सामना ४ ऑक्टोबरला होणार आहे. इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय टी२० विश्वचषकासाठी निवडलेल्या खेळाडूंना ५ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा विचार करत आहे.

हेही वाचा   :  आगामी दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेसाठी हार्दिक, भुवनेश्वरला विश्रांती; मोहम्मद शमी अजूनही दुखापतग्रस्त! 

ऑस्ट्रेलियामध्ये खेळाडूंना तयारीची पूर्ण संधी मिळावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. बीसीसीआयने या संदर्भात संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशीही चर्चा केली आहे. जर खेळाडू ५ ऑक्टोबरलाच ऑस्ट्रेलियात पोहोचले तर त्यांना सरावासाठी अतिरिक्त आठवडा मिळेल. विश्वचषकामध्ये टीम इंडियाचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. याशिवाय टीम इंडियाला दोन सराव सामनेही खेळायचे आहेत.

हेही वाचा   :  Ind vs AUS 3rd T20 : अक्षर पटेलची जादू चालली, त्याच्या फिरकीने कांगारू घायाळ 

या खेळाडूंना संधी मिळणार

एकदिवसीय मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार हे निश्चित आहे. शिखर धवनला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतही संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. या मालिकेत अशा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते ज्यांचे टी२० विश्वचषक संघात स्थान हुकले आहे. शुभमन गिल फक्त सलामीवीराच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संजू सॅमसंग, राहुल त्रिपाठी, इशान किशन, आवेश खान, मोहम्मद सिराज या खेळाडूंनाही संधी दिली जाऊ शकते. मात्र, विश्वचषकासाठी राखीव ठेवण्यात आलेले खेळाडू संघासह ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे.