Hardik Pandya Celebration After Hitting Fastest Fifty: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना अहमदाबादच्या नरेंद्रे मोदी स्टेडियममध्ये पा पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मारक्रमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला दमदार सुरूवात मिळाली होती. कर्णधार सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद होऊन माघारी परतल्यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजीला आला आणि त्याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या डावात फलंदाजी करताना त्याने १६ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दरम्यान अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने भन्नाट सेलिब्रेशन केलं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यात फलंदाजीला येताच त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत त्याने खेळी सजवली. ज्या पद्धतीने तो फटके मारत होता, ते पाहून दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजही आश्चर्यचकीत झाले होते. पहिल्याच चेंडूवर षटकार मारल्यानतंर त्याने अवघ्या ७ चेंडूत ३१ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर १६ चेंडूत त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे कुठल्याही भारतीय फलंदाजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकावलेलं दुसरं सर्वात वेगवान अर्धशतक आहे. याआधी युवराज सिंगने १२ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. हा विक्रम अजूनपर्यंत कुठल्याही भारतीय फलंदाजाला मोडता आलेला नाही.
हार्दिक पांड्याचं सेलिब्रेशन
हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना पाहण्यासाठी हार्दिक पांड्याची कथित गर्लफ्रेंड महिका शर्मा देखील उपस्थित होती. हार्दिकने १६ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बॅट हवेत उंचावली. त्यानंतर स्टँड्समध्ये बसलेल्या महिका शर्माकडे पाहून बॅट हवेत उंचावली आणि फ्लाईंग किस दिली. या सेलिब्रशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने उभारला २३१ धावांचा डोंगर
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजासाठी आलेल्या भारतीय संघाकडून संजू सॅमसनने ३७ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने ३४ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या तिलक वर्माने ७३ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. तर हार्दिक पांड्याने ६३ धावा चोपल्या. शेवटी शिवम दुबेने १० धावा केल्या. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २३१ धावा केल्या.
