Hardik Pandya Gesture After Ball Hits To Cameraman: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने पहिल्या चेंडूपासून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. या सामन्यात त्याने अवघ्या १६ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दरम्यान त्याने पहिल्याच चेंडूवर जो षटकार मारला, तो कॅमेरामनला जाऊन लागला. दरम्यान ज्या कॅमेरामनला हा चेंडू लागला, त्या कॅमेरामनला हार्दिकने मिठी मारल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

तर झाले असे की, सूर्यकुमार यादव बाद होऊन माघारी परतल्यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजीला आला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉश गोलंदाजी करत होता. हार्दिकने पहिलाच चेंडू डीप मिड विकेटच्या वरून मारला. हा चेंडू सरळ जावून बाऊंड्री लाईनजवळ असलेल्या कॅमेरामनला जाऊन धडकला. हा चेंडू इतक्या वेगाने लागला, की तो वेदनेने कळवळताना दिसला. हे पाहताच सपोर्ट स्टाफमधील सदस्य ताबडतोब त्याच्याकडे धावले. बाऊंड्रीलाईनजवळ त्याला वैद्यकीय मदत मिळत असताना, त्याच्यावर बर्फाचा पॅक लावण्यात आला.

हार्दिक पांड्यानेही कॅमेरामनची भेट घेतली आणि त्याची विचारपूस केली. हार्दिकने मोठ्या मनाने हार्दिक पांड्याला मिठी मारली. हे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. हे पाहताच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं. अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याला नेहमीच भरभरून प्रेम मिळतं. कारण हार्दिक बडोद्याचा आहे. त्याने २ हंगामात गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व केलं आहे. हार्दिकनेही आपल्या चाहत्यांना नाराज केलं नाही. पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत त्याने तुफान फटकेबाजी केली. त्याने ७ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या होत्या. त्यानंतर १६ चेंडूंमध्ये त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

भारतीय संघाचा विजय

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडेन मारक्रमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २३१ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकं झळकावली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेलाही चांगली सुरूवात मिळाली होती. पण भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं. भारतीय संघाकडून वरूण चक्रवर्तीने ४ आणि जसप्रीत बुमराहने २ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेला २०१ धावांपर्यंत मजल मारता आली.