Akash Chopra On Dhruv Jurel: भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्धच्या मालिकेतील दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये त्याने दमदार शतकं झळकावली. या दमदार कामगिरीनंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी प्लेइंग ११ मध्ये स्थान देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पण ऋषभ पंत संघाचा भाग असताना ध्रुव जुरेलला संधी कशी मिळणार?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान आकाश चोप्राने यावर उपाय सांगितला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्ध झालेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने १३२ आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने १२७ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो भारतीय अ संघाकडून खेळताना एकाच सामन्यात २ शतकं झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम नमन ओझाच्या नावावर होता.

ध्रुव जुरेलला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणार का?

आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले की, “ध्रुव जुरेलला प्लेइंग ११ मध्ये जागा मिळायला हवी, पण ऋषभ पंतला बाहेर करून नाही. भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत दोघांनाही संधी दिली जाऊ शकते. ऋषभ पंत खेळणारच कारण तो संघाचा उपकर्णधार आहे. पण ध्रुव जुरेललाही संधी मिळायला हवी.”

ध्रुव जुरेलला संधी देण्यासाठी कोणाला बाहेर करणार?

ध्रुव जुरेलचा फॉर्म पाहता, त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळायलाच हवी. पण त्याला कोणाच्या जागी संधी मिळणार? याबाबत बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “ध्रुव जुरेलला संधी देण्यासाठी तुम्ही साई सुदर्शनला बाहेर करणार का? मला तरी वाटतं, साई सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकावर खेळू द्या. नितीश कुमार रेड्डीच्या जागी ध्रुव जुरेलला संधी दिली जाऊ शकते.” आता ध्रुव जुरेलला संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.