Irfan Pathan On Team India Defeat: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना रायपूरमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३५९ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते.विजयासाठी इतकं मोठं आव्हान दिल्यानंतर भारतीय संघाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली आणि दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-१ ने बरोबरी केली आहे. दरम्यान हा सामना गमावल्यानंतर माजी खेळाडू इरफान पठाणने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना इरफान पठाण म्हणाला, “केएल राहुलने फिनिशरची भूमिका पार पाडली. त्याने शेवटी फलंदाजी करताना महत्वपूर्ण खेळी केली. जर त्याने फलंदाजी केली नसती, तर भारतीय संघ इतक्या धावांपर्यंत पोहोचू शकला नसता. माझ्या मते, रवींद्र जडेजाच्या खेळीमुळे डाव गडबडला. त्याने २७ चेंडूत २४ धावांची खेळी केली.जडेजा फलंदाजी करत असताना मी समालोचन करत होतो. आमची हीच चर्चा सुरू होती की, संघाची धावसंख्या ३०० पार गेल्यानंतर १०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने धावा करायला हव्या होत्या. त्याने ८८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. पण जडेजा ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, ते निराशाजनक होतं. तो आणखी चांगली खेळी करू शकला असता.
भारतीय संघाने उभारला ३५८ धावांचा डोंगर
या सामन्यातही भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालला चांगली सुरूवात मिळाली होती. पण त्यानंतर दोघेही बाद होऊन माघारी परतले. त्यानंतर विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाडने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली. दरम्यान ऋतुराज गायकवाडने आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावत १०५ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने लागोपाठ दुसरे शतक झळकावत १०२ धावांची खेळी केली. शेवटी केएल राहुलने नाबाद ६६ धावा केल्या.यासह भारतीय संघाने पहिल्या डावात ३५८ धावांचा डोंगर उभारला.
दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी ३५९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला सुरूवातीलाच मोठे धक्के दिले. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार तेंबा बावूमा आणि एडेन मारक्रम यांनी महत्वपूर्ण भागीदारी करून आपल्या संघाला सामन्यात टिकवून ठेवलं. यादरम्यान एडेन मारक्रमने दमदार शतकी खेळी केली. तर ब्रीत्झ्केने ६८ आणि डेवाल्ड ब्रेव्हिसने ५४ धावांची खेळी करून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.
