भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा दुसरा टी ट्वेंटी सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा चार गडी राखून पराभव केला. त्यामुळे, पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये आफ्रिकेला २-० अशी आघाडी मिळाली आहे. कटकमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने एक विशेष कामगिरी केली. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आफ्रिकन संघासाठी सर्वात वेगवान ५० बळी टिपण्याची कामगिरी त्याने केली आहे.

नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड सलामी देण्यासाठी मैदानात उतरले होते. कगिसो रबाडाने पहिल्याच षटकात ऋतुराज गायकवाडला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. गायकवाडला बाद केल्यानंतर, तो टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ५० बळी घेणारा चौथा आफ्रिकन गोलंदाज ठरला. याबरोबरच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ५० बळी पूर्ण करणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज ठरला.

रबाडाने ४२ सामन्यात ५० बळी घेतले. डावखुरा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ३१ सामन्यांमध्येच ही कामगिरी केली होती.

इमरान ताहिर, डेल स्टेन आणि तबरेझ शम्सी हे दक्षिण आफ्रिकेच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० बळी घेणाऱ्या गोलंदाजांपैकी आहेत. आता या क्लबमध्ये कगिसो रबाडाचाही समावेश झाला आहे. ताहिरने ६१, स्टेनने ६४ आणि शम्सीने ५७ बळी घेतलेले आहेत. या तिघांपैकी आता फक्त शम्सी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो आहे.