What is The Turning Point of IND vs SA Match: भारताला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुपर-८ सामन्यात तब्बल ७६ धावांनी दारूण पराभव पत्करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने आपल्या भेदक गोलंदाजीसमोर भारताच्या फलंदाजांना सामन्यात टिकू दिलं नाही आणि त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेचा संघ सोपा विजय मिळवू शकला आहे. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८७ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात भारतीय संघ १११ धावांवर सर्वबाद झाला आहे. यासह या सामन्याचा टर्निंग पॉईंट नेमका काय ठरला, जाणून घेऊया.
२०२४ च्या टी२० विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाचा दक्षिण आफ्रिकेने जणू व्याजासकट बदला घेतला आहे. टीम इंडिया आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विजय मिळवेल अशी आशा सर्वांनाच होती, पण द. आफ्रिकेने बाजी मारली. नाणेफेक गमावून टीम इंडिया गोलंदाजीसाठी उतरली. भारताची सुरूवात दणक्यात झाली आणि त्यांनी २० धावांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं. पण यानंतर डेविड मिलर व ट्रिस्टन स्टब्स यांनी ९७ धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. ज्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेली. पण भारताने या सामन्यात पुनरागमन केलं आणि धावसंख्या २००च्या आत राखली.
डेविड मिलरने ६३ धावा, ब्रेविस ४५ धावा तर ट्रिस्टन स्टब्सने ४४ धावा केल्या. यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ १८७ धावांपर्यंत मजल मारू शकला. पण प्रत्युत्तरात मात्र भारताचा संघ फलंदाजीत फिका पडला आणि टीम इंडियाच्या सर्व फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्या, इथेच सामना फिरला.
कुठे फिरला भारत-दक्षिण आफ्रिका सामना?
भारताकडून सलामीला इशान किशन व अभिषेक शर्माची जोडी उतरली. अभिषेक खराब फॉर्मातून जात असल्याने इशानने स्ट्राईक घेतली. एडन मारक्रम या सामन्यात प्रथम गोलंदाजीला आला आणि इशान किशन शून्यावर बाद झाला. त्यानंतर यान्सनच्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तिलक वर्मा झेलबाद झाला. त्याच्या बॅटची कड घेत चेंडू विकेटकिपरच्या हातात गेला आणि सोपी विकेट गमावली. तर पाचव्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात अभिषेक शर्मा झेलबाद झाला. पॉवरप्लेमध्ये गमावलेल्या ३ विकेट्स खरंतर सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. भारताचे ३ मोठे फलंदाज माघारी परतल्याच्या धक्क्यातून टीम इंडिया सावरू शकली नाही आणि भागीदारी रचण्यात अपयशी ठरली.
इशान किशन शून्य, तिलक वर्मा १ धाव तर अभिषेक शर्मा १५ धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार सूर्यकुमारदेखील १८ धावांवर माघारी परतला. अखेरच्या षटकांमध्ये हार्दिक पंड्या व शिवम दुबे यांनी मोठे फटके मारण्याचं धाडस दाखवलं आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना तोडीस तोड टक्कर दिली. पण हार्दिकही १८ धावांवर बाद झाला. यानंतर एकट्या शिवम दुबेने धावांचा डोंगर कमी करण्याचा प्रयत्न केला. दुबेने ३७ चेंडूत १ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांची खेळी केली. याशिवाय भारताचा एकही फलंदाज २० धावादेखील करू शकला नाही आणि परिणामी संघ १११ धावांवर सर्वबाद झाला. द. आफ्रिकेकडून मार्काे यान्सनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर केशव महाराज ३ व कार्बिन बॉश २ आणि एडन मारक्रम १ या गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या.
आता भारताचा सुपर-८ मधील पुढील सामना झिम्बाब्वे संघाविरूद्ध होणार आहे. हा सामना गुरूवारी २६ फेब्रुवारीला चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यात संघाची कामगिरी कशी असणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.
