Rishabh Pant Stumping, IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना गुवाहाटीच्या मैदानावर सुरू आहे.या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ३५० हून अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान वेरेन आणि मुथुसामी यांची भागीदारी तोडण्यासाठी यष्टीमागे ऋषभ पंतने वाऱ्याच्या वेगाने स्टंपिंग केली.

या सामन्यात काईल वेरेन आणि मुथुसामी ही जोडी भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरली. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या ६ फलंदाजांना माघारी धाडलं होतं. पण त्यानंतर वेरेन आणि मुथुसामी या जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. दोघांनी मिळून ७ व्या विकेटसाठी ८८ धावा जोडल्या. अर्धशतकाच्या जवळ असताना वेरेन ४५ धावांवर बाद होऊन माघारी परतला.

तर झाले असे की, पहिल्या डावात भारतीय संघाकडून १२१ वे षटक टाकण्यासाठी रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला. वेरेन आणि मुथुसामीची जोडी चांगलीच जमली होती. दरम्यान १२१ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर वेरेनने स्टेपआऊट होऊन मारण्याचा प्रयत्न केला. वेरेन पुढे येतोय हे जडेजाला आधीच समजलं होतं. त्यामुळे त्याने शेवटच्या क्षणी आपली लाईन बदलली आणि चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. यष्टीमागे असलेल्या ऋषभ पंतने कुठलीही चूक न करता वाऱ्याच्या वेगाने स्टंपिंग केली. त्यामुळे वेरेनला ४५ धावांवर माघारी परतावं लागलं.

दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ३५० पार

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मारक्रमने ३८, रायन रिकल्टनने ३५, ट्रिस्टन स्टब्सने ४९, कर्णधार तेंबा बावूमाने ४१ धावांची खेळी केली. तर टोनी डे जोर्जीने २८, वियान मुल्डरने १३ आणि काईल वेरेने ४५ धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेने १२७ षटकांअखेर ३६७ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ३ गडी बाद केले आहेत. तर रवींद्र जडेजाने २, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराजने प्रत्येकी १-१ गडी बाद केला आहे.