ICC T 20 World Cup: आगामी T20 विश्वचषक २०२२ संघात संजू सॅमसनला स्थान न मिळाल्याने अनेक चाहते आणि काही माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले होते, यानंतर आता मध्यंतरी संजू सॅमसनला उपकर्णधारपद देण्याबाबत चर्चा सुरु होत्या. कर्तबगार असुनही संजूला ऋषभ पंतसारखी संधी मिळाली नाही हे अनेकांना खटकले होते. मात्र निवड समिती यष्टीरक्षक बदलण्याच्या विचारात दिसत नसल्याने संजूला आता फलंदाज म्हणून संघात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला त्याला अनेकांनी दिला आहे .

संजू सॅमसनचे आयपीएलमधील पराक्रम पाहता अलीकडेच बीसीसीआयने संजूला न्यूझीलंडविरुद्धच्या भारत अ संघाचे कर्णधार बनवले. यावरून अंदाज येतो की संजूच्या खेळावर काही शंका नसली तरी संघाच्या बांधणीला बघता त्याला स्थान देणे विसंगत ठरू शकते. याच पार्श्वभूमीवर संजूचे नाव चर्चेत असताना भारताचा माजी गोलंदाज श्रीसंत याने संजूवर भाष्य केले आहे.

विश्वचषक विजेता एस श्रीसंतने हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना सांगितले की “ संजूने सातत्य राखले पाहिजे. त्याच्या आयपीएलमधील खेळाबद्दल सर्वच बोलत आहेत. मी केरळचा आहे, मी अशी व्यक्ती आहे ज्याने त्याला नेहमीच पाठिंबा दिला आहे. मी त्याला U14 पासून खेळताना पाहिले आहे. तो माझ्या हाताखाली खेळला आहे. मीच त्याला त्याच्या रणजी ट्रॉफी पदार्पणाची कॅप दिली होती. पण मला वाटत त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये खेळण्याच्या दृष्टीने कामगिरी करायला सुरुवात करावी”.

India T-20 Wins in 2022: ऑस्ट्रेलियाचा पराभव आणि पाकिस्तानला दणका; टीम इंडियाने मोडला ‘हा’ विक्रम

श्रीसंत पुढे म्हणाला की, आयपीएल खूप महत्त्वाचं आहे. IPL त्याला जगभरात प्रसिद्धी, लोकप्रियता आणि संपत्ती देईल. पण कोणत्याही क्रिकेटपटूसाठी – त्यांना राज्य संघासाठी, विशेषत: प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. केवळ शतक नाही तर २०० धावा करा. या आणि केरळ संघाला रणजी करंडक जिंकून द्या! केरळ संघाला विजय हजारे करंडक जिंकून द्या. त्यानंतर केरळचे क्रिकेटपटू अव्वल स्थानावर येतील.”

दरम्यान, संजू आयपीएलमध्ये खेळतोय, त्याचे खूप कौतुक आहेच. जगभरातील मल्याळम भाषिक लोक त्याला पाठिंबा देत आहेत असेही पुढे श्रीसंत म्हणाला आहे.