Shubman Gill On Team India Defeat: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. या मालिकेत भारतीय संघाला २-० ने दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात फलंदाजी करत असताना शुबमन गिलच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. दुखापत गंभीर असल्यामुळे तो पुन्हा मैदानावर येऊ शकला नव्हता. दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकावं लागलं होतं. दरम्यान या मालिकेत झालेल्या पराभवानंतर गिलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी १२३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ३० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी ५४९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला ४०८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यासह दक्षिण आफ्रिकेने भारतात खेळताना २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली आहे. याआधी २००० साली दक्षिण आफ्रिकेने भारतात खेळताना कसोटी मालिका जिंकली होती. याआधी न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या मालिकेतही भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे गेल्या मायदेशात खेळताना गेल्या ३ पैकी २ मालिकांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या फ्लॉप कामगिरीनंतर कर्णधार शुबमन गिलवर आणि मुख्य प्रशिक्षक शुबमन गिलवर जोरदार टीका केली जात आहे. दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर सामना पाहण्यासाठी आलेले क्रिकेट चाहते गंभीरविरोधात घोषणाबाजी करताना दिसून आले. दरम्यान गिलने पोस्ट शेअर करून आपली प्रतिक्रिया दिली आहे, त्याने एक कोट शेअर केला आहे.
या कोटमध्ये लिहिलं आहे की, “शांत समुद्र तुम्हाला जहाज चालवायला शिकवत नाही. तर वादळच आपल्याला मजबूत बनवते. आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवत राहू, एकमेकांसाठी लढत राहू आणि अधिक ताकदीने पुढे जात राहू.” गिलने ही पोस्ट शेअर करून पराभवानंतरही संघाची एकता कायम ठेवण्याचा आणि भूतकाळातील चुकांमधून शिकून एकत्रपणे अधिक ताकदीने पुनरागमन करण्याचा आणि पुढे जाण्याचा निश्चय केला आहे.
मालिकेतील पहिला सामना हातून निसटल्यानंतर गिल दुसऱ्या सामन्यात पुनरागमन करणार अशी चर्चा रंगली होती. पण तो दुसऱ्या सामन्याआधी पूर्णपणे फिट होऊ शकला नाही. त्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली. तर भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ऋषभ पंतकडे सोपवण्या आली. आता कसोटी मालिका झाल्यानंतर वनडे आणि टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका अतिशय महत्वाची असणार आहे.
