Shubman Gill, IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना मुल्लानपूरमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकांअखेर २१३ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात फलंदाजी करताना क्विंटन डीकॉकने भारतीय गोलंदाजांविरूद्ध फलंदाजी करताना चांगलाच हल्लाबोल केला. पण धावांचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा भारतीय फलंदाज मैदानात आले, त्यावेळी भारतीय फलंदाजांना काही सूर गवसला नाही. भारताचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला.

येत्या काही दिवसात भारतात आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेच्या दृष्टीने तयारी देखील सुरू केली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेली टी-२० मालिका ही भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची आहे. पण या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये शुबमन गिलचा सुपर फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. शुबमन गिल टी-२० संघाचा उपकर्णधार आहे. पण त्याला उपकर्णधारपदाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शुबमन गिल टी-२० संघाचा भाग बनल्याने संजू सॅमसनला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळत नाहीये.

गिलला २०२५ मध्ये १४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. पण त्या १४ सामन्यांमध्ये त्याला एकही अर्धशतकी खेळी करता आलेली नाही. यादरम्यान ४७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. ही खेळी त्याने त्याने आशिया चषक २०२५ स्पर्धेत पाकिस्तानविरूद्ध खेळताना केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या गिलला टी-२० क्रिकेटमध्ये आपली छाप सोडता आलेली नाही. त्याला १४ सामन्यांमध्ये अवघ्या २६३ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे गिल खरंच टी-२० संघात फिट बसतो का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

टीम इंडियासाठी टेन्शन वाढवणारी बातमी

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२० सामन्यांची मालिका झाल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टी-२० वर्ल्डकपआधी ही शेवटची टी-२० मालिका असणार आहे. या महत्वाच्या मालिकेआधी शुबमन गिलचा हा फॉर्म, भारतीय संघासाठी चिंता वाढवणारा ठरू शकतो. गिल फॉर्ममध्ये परतणार का? की भारतीय संघ आपल्या योजनेत बदल करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.