भारताने पहिल्या कसोटी सामन्यात आफ्रिकेवर २०३ धावांनी विजय मिळवूला. मोहम्मद शमी, रविंद्र जाडेजा यांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर विराट कोहलीच्या भारतीय संघाने विशाखापट्टणम कसोटीत पाचव्या दिवशी विजय संपादन केला. दुसऱ्या डावात आफ्रिकेला विजयासाठी ३९५ धावांचे आव्हान भारतीय संघाने दिले होते. भारतीय गोलंदाजांनी एकाही आफ्रिकन फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावण्याचा वेळ दिला नाही. आक्रमक गोलंदाजी करत भारताने आफ्रिकेचा डाव १९१ धावांत गुंडाळला.

विशाखापट्टणम कसोटीतील विजयासह भारतीय संघाने ICC च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत आपले अव्वल स्थान कायम राखले. सध्याच्या घडीला भारतीय संघ १६० गुणांसह अव्वल स्थानी आहे. आतापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये भारतीय संघ विजयी झाला. भारताच्या खालोखाल न्यूझीलंड आणि श्रीलंका ६० गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. या अद्ययावत (अपडेटेड) गुणतालिकेत भारत अव्वल असूनही विराट मात्र नाराज आहे.

पुण्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेबाबत नाराजी व्यक्त केली. परदेशी मैदानावर सामना जिंकल्यास दुप्पट गुण मिळायला हवेत असे  मत विराटने व्यक्त केले. “मला जर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेची नियमावली तयार करायला सांगितली असती, तर मी परदेशी मैदानावर मिळवलेल्या विजयासाठी दुप्पट गुणांची तरतूद करण्याबाबत सुचवले असते”, असे कोहली म्हणाला.

याशिवाय, दुसऱ्या कसोटी मालिकेत विजय टीम इंडियायाच होणार असा विश्वासही त्याने व्यक्त केला. १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात दुसरी कसोटी खेळण्यात येणार आहे.