What is the Turning Point of India win: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका ३-१च्या फरकाने जिंकली आहे. टीम इंडियाने अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवला. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २३२ धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने कमालीची फटकेबाजी करत सुरूवात केली, पण एक षटक सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरलं, जाणून घेऊया सविस्तर.
भारताने प्रथम फलंदाजी करताना २३१ धावांचा डोंगर उभारला. भारताकडून संजू सॅमसन व अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचत संघाला चांगली सुरूवात करून दिली. यानंतर हार्दिक पंड्या व तिलक वर्मा यांच्या शतकी भागीदारीच्या वादळाने संघाला मोठी धावसंख्या रचण्यात मोठी भूमिका बजावली.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना कमालीची सुरूवात केली. क्विंटन डीकॉक उत्कृष्ट फॉर्मात होता. त्याने रीझा हेंड्रिक्सच्या साथीने संघाला ३.३ षटकांत ५० धावांचा पल्ला गाठून दिला. पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेने एकही विकेट न गमावता ६७ धावा केल्या. त्यानंतर पुढच्या षटकात शिवम दुबेने वरूणच्या गोलंदाजीवर कमाल झेल टिपत हेंड्रिक्सला माघारी धाडलं. पण यानंतरही फटकेबाजी सुरूच होती.
काय ठरला भारताच्या विजयाचा टर्निंग पॉईंट
क्विंटन डीकॉकसह डेवाल्ड ब्रेविसने फटकेबाजीला सुरूवात केली. त्यानंतर नवव्या षटकात ब्रेविसने २३ धावा कुटत धावांची गती वाढवली. यानंतर १०व्या षटकातही दोघांनी मिळून १९ धावा कुटल्या. यासह दक्षिण आफ्रिका १० षटकांत १ बाद ११८ धावांवर होता. रन रेट पण दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकलेला दिसला. यानंतर सूर्यकुमार यादवने जसप्रीत बुमराहला गोलंदाजीला आणलं. सूर्यकुमार यादवने या सामन्यात बुमराहला पॉवरप्लेमध्ये एक षटक दिलं आणि त्याला मधल्या षटकांसाठी ठेवलं आणि सूर्याची ही चालाखी संघासाठी महत्त्वाची ठरली.
जसप्रीत बुमराह ११व्या षटकात गोलंदाजीला आलं. या षटकात ब्रेविसने एक धाव घेत डीकॉकला स्ट्राईक दिली. चालाख बुमराहच्या गोलंदाजीवर डीकॉक स्ट्रेट शॉट मारायला गेला व बुमराहने त्याला झेलबाद केलं आणि या विकेटनंतर सामना भारताच्या बाजूने फिरला. बुमराहने ११व्या षटकात फक्त ४ धावा देत दक्षिण आफ्रिकेवर दबाव टाकला, यानंतर हार्दिकने पुढच्याच षटकात ब्रेविसलाही माघारी धाडलं. यानंतर दक्षिण आफ्रिकेने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या.वरूण चक्रवर्तीने यानंतर झटपट ३ विकेट्स घेतल्या व दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मैदानावर स्थिरावू दिलं नाही.
