विराट कोहलीसाठी ११ जानेवारी २०२१ हा दिवस खास आहे. या दिवशी त्याची मुलगी वामिकाचा जन्म झाला. त्यामुळे आता आगामी वर्षात वामिकाचा पहिला वाढदिवस साजरा होणार आहे. अशा परिस्थितीत विराट आपल्या मुलीला काय खास गिफ्ट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (CSA) भारतीय दौऱ्याचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. ११ जानेवारीपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे.

विराटने आतापर्यंत ९७ कसोटी सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत त्याने या दौऱ्यातील सर्व सामने खेळल्यास केपटाऊनमध्ये होणारी कसोटी ही त्याच्या कारकिर्दीतील १००वी कसोटी ठरेल. म्हणजेच तो विशेष क्लबमध्ये सामील होईल. या दिवशी करोडो चाहते जल्लोष करतील. म्हणजेच वामिकाचा वाढदिवसही खास ठरणार आहे. विराट मोठी खेळी करून हा सामना संस्मरणीय करू शकतो.

हेही वाचा – भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा : नव्या वेळापत्रकाची घोषणा; वाचा कधी, कुठे होणार कसोटी आणि वनडे मालिका!

विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत २७ शतके आणि २७ अर्धशतके केली आहेत. म्हणजेच, त्याने ५४ वेळा अर्धशतकाहून जास्त धावा केल्या आहेत. नाबाद २५४ धावा ही त्याची सर्वात मोठी खेळी आहे. मात्र, विराट कोहलीला आतापर्यंत कसोटीत त्रिशतक झळकावता आलेले नाही. २०१९ पासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. अशा स्थितीत त्याला आफ्रिका दौरा संस्मरणीय बनवायचा आहे.

टीम इंडियाला अद्याप दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. सर्वांच्या नजरा नवीन प्रशिक्षक राहुल द्रविडवर असतील. कोहलीने दक्षिण आफ्रिकेत १० कसोटी डावांमध्ये ५८ च्या सरासरीने ५५८ धावा केल्या आहेत. त्याने २ शतके आणि २ अर्धशतके केली आहेत. दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. द्रविड ६२४ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत कोहली त्यांना मागे सोडू शकतो. सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ११६१ धावा केल्या आहेत.