भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात भारतीय संघ आजचा सामना जिंकून निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल. टी२०विश्वचषकापूर्वी हा टीम इंडियाचा शेवटचा सामना असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून थेट विश्वचषकात सामील व्हायचे असा रोहित अॅण्ड कंपनीचा इरादा असेल. विराट आणि केएल राहुलसह अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना शेवटच्या सामन्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे राखीव खेळाडूंना संघात खेळण्याची मोठी संधी आहे.

भारत या मालिकेत २-०ने आघाडीवर असून तिसरा जिंकत मालिकेत दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा हेतू असणार आहे, मात्र कोहली-राहुलच्या अनुपस्थितीत त्यांची जागा कोण घेणार असे प्रश्न निर्माण होत आहेत. श्रेयस अय्यर याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारताचा उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तसेच तो टी२० विश्वचषकाच्या राखीव खेळाडूंमध्येही आहे. पुरूषांचा टी२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे. यातील पहिला सामना १६ ऑक्टोबरला श्रीलंका विरुद्ध नामिबिया यांच्यात खेळला जाणार आहे. यामध्ये भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर २३ ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. त्यासाठी ही टी२० मालिका सराव म्हणून दोन्ही संघासाठी महत्वाची आहे.

हेही वाचा :  टी२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर जसप्रीत बुमराहने सोडले मौन; भावूक होत म्हणाला, ‘मी निराश..’ 

मोहम्मद सिराज व उमेश यादव यांना आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता मालिका जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळू शकतो. आघाडीची फळी चांगली कामगिरी करत आहे, तर दिनेश कार्तिक दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतोय. ॠषभ पंतला अद्याप संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याला संधी मिळावी यासाठी सूर्या, विराट किंवा राहुल यांना विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच बरोबर रोहित समोर गोलंदाजीचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या अंतिम अकरात कोण असेल याचे उत्तर त्याला आजच्या सामन्यात शोधणे अत्यंत महत्वाचे आहे.

हेही वाचा :  जायबंदी बुमरा ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणार! ; ‘बीसीसीआय’ची अधिकृत घोषणा 

इंदोरचे मैदान तेच आहे, जिथे टीम इंडियाने आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट टी२० क्रिकेट खेळले होते. २०१७ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्धच्या टी२० सामन्यात ५ गडी गमावून २६० धावा केल्या होत्या. या सामन्यात रोहित शर्माने अप्रतिम फलंदाजी करत टी२० कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्याही रचली. रोहितने ४३ चेंडूत ११८ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत १० षटकार आणि १२ चौकारांचा समावेश होता. यासोबतच रोहित आणि राहुलमध्ये पहिल्या विकेटसाठी १६५ धावांची विक्रमी भागीदारीही झाली.

हवामान आणि खेळपट्टी

इंदोरच्या होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे तर ती फलंदाजांची खेळपट्टी मानली जाते. या खेळपट्टीवर चांगले बाऊन्स आणि कॅरी उपलब्ध आहेत ज्यामुळे फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. इंदूरची खेळपट्टी गोलंदाजांना कमी मदत करते. हे मैदान अगदी लहान असल्याने आजच्या सामन्यात षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहायला मिळू शकते. होळकर स्टेडियम इंदोरमध्ये सामन्याच्या दिवशी बराच वेळ सूर्यप्रकाश दिसेल आणि पावसाची अजिबात शक्यता नाही.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रेझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्सिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, रिले रॉसो, तबरेझ शम्सी